अकोला : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच मन नदीमध्ये तीन तरुण पोहायला गेले. त्यातील एक तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना शनिवारी जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे घडली. वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे.जिल्ह्याला गेल्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. नदी-नाले भनभरून वाहत आहेत. पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे तीन तरुण मन नदीत पोहण्यासाठी गेले.

नदीत उडी घेताच तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. ते तिघेही पाण्यात वाहून जात होते. त्यातील दोन तरुणांना जिवाच्या आकांताने प्रयत्न केले. ते नदीच्या काठावर सुखरूप पोहोचले. एक युवक मात्र नदीच्या प्रवाहात वाहून गेला. नागेश तेजराव वानखडे (२९), पवन देवलाल वानखडे (२९) व करण सुनील वानखडे (२८) हे तीन तरुण मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्यातील नागेश वानखडे व पवन वानखडे हे दोन मित्र सुखरूप असून करण वानखडे नदीच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदी काठावर गर्दी केली. नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे.

मायलेक वाहून गेले, झुडपात अडकल्याने मुलगी वाचली

मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील ३५ वर्षीय शेतकरी मजूर महिला आपल्या मुलीसह शेतातील काम आटोपून कमळगंगा नदी ओलांडताना अचानक वाढलेल्या पाण्यामुळे मुलीसह वाहून गेली. मुलगी एका काटेरी झुडपात अडकल्याने तिचे प्राण वाचले, महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत महिलेचा शोध घेण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही. मूर्तिजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दोन मंडळात अतिवृष्टी झाली. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. शेतांना तलावाचे स्वरूप आले. कंझरा गावाजवळून वाहणाऱ्या कमळगंगा नदीला मोठा पूर आला. येथील रहिवासी शेतकरी मजूर महिला रेखा रमेश मते (वय ३५) व त्यांची मुलगी साक्षी रमेश मते (वय १४) नदी ओलांडताना वाहून गेल्या होत्या. मुलगी साक्षी एका झुडपाला अडकल्यामुळे तिचा जीव वाचला. महिला प्रवाहासोबत वाहून गेल्या आहेत. त्यांचा गेल्या ३० तासांपासून शोध घेतला जात आहे. पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाचे दीपक सदाफळे व त्यांच्या चमूकडून नदी पात्रात शोध मोहीम राबवली जात आहे.