बुलढाणा : जिल्ह्यातील चार तालुक्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीचा तब्बल ३३९ गावांतील ७८,५७४ हेक्टरवरील खरीप पिकांना जबर तडाखा बसला. एक लाखावर शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून आधीच चोहोबाजूनी संकटात असलेले शेतकरी कोलमडून गेले आहे. सर्वाधिक नुकसान ढगफुटीसदृश पावसाने थैमान घातलेल्या चिखली तालुक्यात झाले. मेहकर तालुक्यातील १६१ गावांतील १२,८५० हेक्टरवरील पिकांची अतोनात नासाडी झाली. मोताळा तालुक्यातील चार गावातील ३८.५० हेक्टर, संग्रामपूर तालुक्यातील २४ गावातील २४७२ हे.वरील पिकांचे नुकसान झाले. या चार तालुक्यांत सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग, कपाशी या खरीप पिकांसह फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले.
चिखली तालुक्यात अतिवृष्टीने ६३,२१४ हे.वरील पिकांचे नुकसान झाले असून एक लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून, तालुक्यात एकूण ६३,२१४ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. एक लाख दोन हजार ८३२ शेतकरी या आपत्तीमुळे बाधित झालेत. तब्बल १५० गावांना फटका बसला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतात पाणी साचले, ज्यामुळे उभी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली. काही ठिकाणी शेतातील माती आणि पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कृषी विभाग, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाने केलेल्या संयुक्त पाहणीत नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे. तालुक्याचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला. ४६,९८९ हे. क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक बाधित झाले. तुरीचे ९,२७५ हे. आणि मक्याचे २,७०० हे. क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. इतर खरीप पिकांमधे हळद ३९८ हे., उडीद १,४४८ हे., मूग ७३३ हे., आले १७६ हे. आणि कपाशी ८२४ हे. या पिकांनाही फटका बसला. ऊस पिकाचे १६ हे. आणि भाजीपाल्याचे ६१३ हे. क्षेत्रावरील नुकसान झाले. याव्यतिरिक्त, फळबागांचेही ३८ हे.वरील पिकांचे नुकसान झाल्याने फळउत्पादक शेतकरीही संकटात आहेत.
वरील नुकसानीचा आकडा प्राथमिक असला तरी शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. या पंचनाम्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा अचूक अंदाज घेऊन लवकरच त्याचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल शासनाकडे मदतीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकरी आता शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत.