अमरावती : गेल्‍या दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात पावसाचा जोर वाढला असून चांदूर बाजार आणि नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात अतिवृष्‍टीची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्‍या चोवीस तासांत जिल्‍ह्यात २८.३ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ६८.९ मिमी पाऊस नांदगाव खंडेश्‍वर आणि ६१.२ मिमी पाऊस चांदूर बाजार तालुक्‍यात झाला आहे.

या पावसामुळे अनेक नाल्‍यांना पूर आला आहे. काही भागांत तर शेतजमीनदेखील खरडून गेली आहे. चांदूर बाजार तालुक्‍यातील पूर्णा मध्‍यम प्रकल्‍पाच्‍या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्‍याने धरणातील पाणी सोडण्‍याची वेळ येऊ शकते, त्‍यामुळे प्रशासनाने पूर्णा नदीकाठावरील ग्रामस्‍थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – आंतरराज्यीय तस्करांचे तार गोंडपिपरीत; छत्तीसगडच्या वनपथकाकडुन गोंडपिपरीतून एकाला अटक

मंगळवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्‍याने चांदूर बाजार तालुक्‍यातील करजगाव, शिरजगाव येथील नाल्‍यांना पूर आला आहे. वरूड तालुक्‍यातील देवना, जीवना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नुकतीच पेरणी झालेल्‍या शेतांमध्‍ये पाणी साचल्‍याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – जागर! राष्ट्रसंत व राष्ट्रपिता यांच्या भेटीला उजाळा देत होणार विचार प्रसार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्‍या चोवीस तासांत पूर्णा प्रकल्‍पाच्‍या पाणलोट क्षेत्रापैकी विश्रोळी येथे ९३ मिमी, सावलमेंढा येथे ७० मिमी आणि बापजई येथे ४० मिमी पाऊस झाला. गेल्‍या चोवीस तासांत पूर्णा प्रकल्‍पात ४.१४ दशलक्ष घनमीटर येवा आला आहे. धरणाची पाणी पातळी ४४७.२५ मीटर असून सध्‍या धरणात १७.४५ दलघमी म्‍हणजे ४९.३६ टक्‍के पाणीसाठा झाला आहे, मात्र १५ जुलैअखेर उपयुक्‍त जलसाठा ४८ टक्‍क्‍यांपर्यंत ठेवणे नियोजित आहे. प्रकल्‍पाच्‍या पाणीसाठ्यात वाढ झाल्‍यास प्रकल्‍पातून विसर्ग सोडण्‍यात येईल, असे पूर्णा प्रकल्‍प पूर नियंत्रण कक्षाकडून सांगण्‍यात आले आहे.