यवतमाळ : जिल्ह्यात काल गुरुवार दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने काल व आज असे दोन दिवस यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. आज सकाळपासून उमरखेड, महागाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने जिल्हा प्रशासनाने उमरखेड व महागाव तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज गुरुवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज सकाळी हे आदेश निर्गमित केले. गुरुवार दुपारपासून उमरखेड, महागाव तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत उमरखेड तालुक्यात ७८ मिमी पावसाची नोंद झाली. तर, महागाव तालुक्यात ३८ मिमी पावसाची नोंद झाली. या दोन्ही तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. उमरखेड शहरात अनेक रस्ते पाण्याखाली आले आहेत. पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी मीना यांनी आज सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस कोसळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यावेळी उमरखेड, महागाव, पुसद, आर्णी, घाटंजी आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास चार लाख हेक्टरवरील पिके खरडून गेली. पालकमंत्र्यांसह, आमदार, अधिकारी आदींनी या भागात पाहणी करून पूरग्रस्तांसह शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पूर्णतः खचला आहे. या पावसामुळे खरीप पीक हातातून निसटल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पुढील २४ तास जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच नदी, नाल्याच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

सण, उत्सवावर पाणी फेरले

सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. दोन दिवसांनी गौरी पूजन होणार आहे. या सण, उत्सवावर पाणी फेरले असून, पावसामुळे नागरिकांचा उत्साह मावळला आहे. याचा फटका बाजारपेठेलाही बसला आहे. पावसामुळे भाज्या, फुले महागल्याने नागरिक वैतागले आहेत. शहरी, ग्रामीण भागात महालक्ष्मी पूजन मोठ्या प्रमाणात साजरे होते. पावसामुळे या उत्सवाचे नियोजन कोलमडले असून, पावसाने आता उसंत घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून सूर्याचे दर्शन झाले नसल्याने विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.