यवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेत मारेगाव तालुक्यातील कलावती बांदूरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला घर, वीज, शौचालय, आरोग्य या सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या, असे ठामपणे सांगून राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. या प्रकारानंतर कलावती बांदूरकर यांनी अमित शहा यांचा दावा खोडून काढत आपल्याला राहुल गांधी यांच्यामुळेच सर्व मदत मिळाल्याचे सांगत केंद्र सरकारला खोटे ठरविले.

संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी एका कलावती नामक महिलेच्या घरी गेले आणि तिची करुण कहाणी संसदेत सांगितली. हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कलावतीला मोदी सरकारने वीज, घर, शौचालय, धान्य आणि आरोग्य या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

हेही वाचा – रोहित पवारांचे फडणवीसांना खरमरीत पत्र… एकवेळ जेवणारा, पाठीचा कणा वाकेपर्यंत लायब्ररीत बसणारा सिरीयस कसा नाही?

यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील जळका येथे राहणाऱ्या कलावतीबाईपर्यंत ही बातमी पोहोचली. माध्यमांनी कलावती बांदूरकर यांना गाठून सत्य जाणून घेतले. तेव्हा अमित शहा संसदेत खोटे बोलले, असे कलावतीबाईंनी ठामपणे सांगितले. राहुल गांधी आपल्या घरी आले होते. त्यानंतर सर्वप्रथम काँग्रेस पक्षाकडून भरीव मदत करण्यात आली. नंतर आपल्याला शासनाकडूनही सर्व शासकीय योजना, अनुदान, मदत मिळाली, असे त्या म्हणाल्या. आज राहत असलेले घर, घरातील साहित्य हे सर्व काँग्रेस काळात मिळाले, असे कलावती यांनी सांगितले.

कलावतीबाई यांचा खुलासा असलेला व्हिडीओसुद्धा समाज माध्यमात प्रसारित झाला आहे. कलावतीबाई यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री शहा यांना खोटे ठरविल्यानंतर शासन काय भूमिका घेते, याकडे जळकावासियांचे लक्ष लागले आहे. संसदेत कलावती बांदुरकर यांचा प्रत्येकवेळी उल्लेख होतो, हे विशेष. या उल्लेखामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

हेही वाचा – पावसाळ्यात “या” रानभाज्या खायलाच हव्यात; आरोग्यासाठी आहेत लाभदायक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कलावती का क्या करा’, म्हणताच सभागृहात सत्ताधारी हसले

गृहमंत्री अमित शहा संसदेत बोलत असताना कलावतीचा नामोल्लेख केला. मात्र त्यांनी बुंदेलखंडचा उल्लेख केला. तेव्हा सत्ताधारी बाकावरून कोणीतरी कलावती यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. शहा यांनी कलावतीचे नाव घेऊन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत ‘ओ कलावती का क्या करा?’ असा उल्लेख उपहासाने केला तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले भाजप मंत्री, खासदार कुत्सितपणे हसले. या प्रकाराने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेच्या व्यथेची, गरिबीची संसद सभागृहात सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी अवहेलना केल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.