बुलढाणा : गुरुवारची मध्यरात्री रोहीच्या रूपाने त्यांना घेऊन जाणाऱ्या ‘टिप्पर’समोर मृत्यूच आडवा आला. यामुळे भरधाव वाहन उलटून दोघे जण घटनास्थळीच दगावले तर पाच जण जायबंदी झाले. मोताळा तालुक्यातील वडगाव मार्गावरील चांदखेड नाल्याजवळ गुरुवारी( दि. १९) मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. आडवे आलेल्या रोहिला वाचवण्याच्या नादात भरवेगातील रेतीवाहक टिप्पर उलटले. यामुळे टिप्पर वर बसलेले दोन मजूर  फेकल्या गेल्याने जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले.

हेही वाचा >>> ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात! खासगी बस उलटली, २० प्रवासी जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालक किरण अरुण इंगळे अंदाजे (३२,  रा. सारोळा मारुती, तालुका मोताळा) याचा वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यामुळे रेतीच्या ढिगाऱ्यावर बसलेले  नितीन समाधान इंगळे (वय २८) आणि विरेंद्र राजेंद्र पाटील (वय २७)  हे वडगाव येथील  रहिवासी असलेले मजूर फेकल्या गेले. दोघेही घटनास्थळावरच दगावले. संजय देवसिंग हिवाळे, किशोर शांताराम हिवाळे, प्रमोद विठ्ठल हिवाळे, शांताराम प्रभाकर हिवाळे आणि चालक किरण इंगळे असे पाचही जण गंभीर जखमी झाले आहे.  बोराखेडी पोलिसांनी प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक किरण इंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.