अद्याप खोल्यांची पूर्व नोंदणी नाही

नागपूर : दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत असते. त्यासाठी बाहेरगावून आलेले आमदार, अधिकारी व इतर मंडळी नोव्हेंबर महिन्यातच नागपूरच्या बडय़ा पंचतारांकित हॉटेलमध्ये पंधरा दिवसांसाठी खोल्यांची पूर्व नोंदणी करत असतात. मात्र यावेळी लांबलेल्या सत्तास्थापनेमुळे अद्याप हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक संभ्रमात आहेत.

नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. मिहान आणि सेझमध्ये मोठे औद्योगिक प्रकल्प तसेच पेंच आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे येथील तारांकित हॉटेलांमध्ये नेहमी पर्यटकांची लगबग असते. याशिवाय आजकाल लग्न समारंभ सोहळा देखील बडय़ा हॉटेलांमध्ये साजरा करण्याचा कल वाढला आहे. अशात डिसेंबर महिन्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असल्याने या काळात आमदारांसाठी शहरातील सर्व प्रमुख मोठे हॉटेलच्या खोल्यांची पूर्व नोंदनी करण्यात येत असते.  हॉटेलचालकही हिवाळी अधिवेशनाची दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतात. मात्र सध्या नोव्हेंबर महिना संपायला आला तरी कोणत्याही हॉटेलात आमदारांकडून खोल्यांची नोंदणी झालेली नाही. सध्या लगनसराईचा मोसम आहे. अशावेळी  पूर्व नोंदणीसाठी  राजकीय नेत्यांचा फोन आला तर काय करायचे, असा प्रश्न हॉटेल चालकांसमोर पडला आहे. बहुतांश हॉटले चालक डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून इतर नोंदणी घेत नाही. कारण यादरम्यान आमदरांसह इतरांची नोंदणी होत असते. यातून हॉटेल चालक बक्कळ पैसा कमावतात. नागपुरात पंचतारांकित दोन हॉटेल आहेत. त्यामुळे याच हॉटेलांकडे आमदारांचा अधिक कल असतो. मात्र अद्याप अधिवेशन जाहीर न झाल्यामुळे यंदा खोल्या रिकाम्या राहतील का, अशी चिंता हॉटेल मालकांना भेडसावत आहे.

दरवर्षी नोव्हेंबर अखेपर्यंत हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमच्या हॉटेलमध्ये पूर्व नोंदणी होत असते. मात्र यंदा नोव्हेंबर महिना संपायला आला तरी पूर्व नोंदणी झालेली नाही. त्यामुळे आम्ही लग्ननसराईसाठी  खोल्यांच्या पूर्व नोंदणी देणे सुरू केले आहे. पुढील आठवडय़ात अगदी वेळेवर पूर्व नोंदणी आल्यास आम्ही खोल्या देऊ शकू की नाही याबद्दल संभ्रम आहे.

– सुमित बावनकुळे, विक्री व्यवस्थापक, हॉटेल ली मेरिडियन.

आमच्याकडे नोव्हेंबर महिन्यात आमदारांच्या खोल्यांची पूर्व नोंदणी होत असते. मात्र अजून कोणत्याच प्रकारची विचारणा झाली नाही. सध्या शहरात लग्नसराई असल्याने हॉटेलांच्या खोल्यांची काही प्रमाणात नोंदणी झाली आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यावर नोंदणी होण्याची शक्यता आहे. परंतु त्यावेळी हव्या तेवढय़ा खोल्या रिकाम्या असतील का हे आज सांगता येणार नाही.

– श्रीधर विकी, व्यवस्थापक, हॉटेल रेडिसन ब्ल्यू.