अमरावती : जुन्या वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट रोजी संपत आहे. तरीही अमरावती जिल्ह्यातील ८३ टक्के वाहनांवर अजूनही जुन्याच नंबरप्लेट आहेत. त्यामुळे जुन्या वाहनधारकांची धाकधुक वाढली आहे. १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई होणार की पुन्हा मुदतवाढ मिळणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०१९ पुर्वी नोंदणी झालेली सुमारे ४ लाख ६५ हजार ४९० इतकी वाहने आहेत. अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १ एप्रिल २०१९ पुर्वी उत्पादित झालेल्या वाहनांपैकी एकूण ७६ हजार १४८ वाहनधारकांनी ‘एचएसआरपी’ साठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. आतापर्यंत एकूण ६३ हजार ८१७ नंबर प्लेट तयार करण्यात आल्या असून ५० हजार २२२ वाहनांना या नंबरप्लेट बसविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात यासाठी १० कंपन्यांना अधिकृत करण्यात आले आहे. अमरावती शहर व जिल्ह्यात असे एकूण २७ केंद्र निश्चित केले आहेत.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये अदलाबदल व बनावटगिरीच्या गुन्ह्यांना आळा घालणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठी केंद्रीय मोटर नियमाप्रमाणे बंधनकारक केले आहे. दरम्यान १ एप्रिल २०१९ पूर्वी ज्यांनी वाहन खरेदी केले, अशा सर्व वाहनांवर आता ‘एचएसआरपी’ लावावी लागणार आहे.

केंद्रीय मोटार नियम १९८९ चे नियमानुसार सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक केले आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याची मुदतवाढ संपुष्टात येत असल्यामुळे वाहनधारकांनी नंबर प्लेट अद्यापपर्यंत बसविलेली नाही किंवा अद्यापपर्यंत बसविण्यास पूर्वनियोजित दिनांक घेतलेली नाही, अशा वाहनांवर नियमानुसार वायुवेग पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परिवहन कार्यालयातील वाहनाचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्र बदल करणे, वित्तदाता याचा बोझा चढविणे, उतरविणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे आदी कामे करण्यास अडचण येईल. परंतु उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बुक केल्याची पावती कार्यालयात सादर केल्यानंतरच सदर काम करण्यात येणार आहे.

वाहनधारकांनी नंबर प्लेट बसविण्यासाठी पूर्वनियोजीत दिनांक घेतलेली आहे, त्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार नाही, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.