यवतमाळ – जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये येत्या २ डिसेंबर रोजी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारासह नामांकन अर्जावरील सूचक आणि अनुमोदकांचा कोणताही सरकारी कर थकीत नसावा, ही अट असल्यामुळे नगरपरिषद कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भावी नगरसेवकांची स्वतःची कराची थकबाकी भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार अर्ज सादर करण्यापूर्वी मागील तीन ते चार वर्षांची थकबाकीही भरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या महसूल वसुलीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रत्येक वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर थकविणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. वारंवार वसुलीसाठी संबंधितांच्या घरी चकरा मारूनही कर भरला जात नाही. मात्र, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच भावी नगरसेवकांनी स्वतःहूनच कर भरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायतीची कर वसुली सध्या जोमात सुरू आहे. नामांकन दाखल करण्यासाठी विविध कागदपत्रं, प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. मात्र, त्यापूर्वी लागणारी आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. त्यामध्ये घरी शौचालय असल्याचा दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी थकीत नसल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला व अन्य कागदपत्रांसाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्याअगोदर थकीत कर भरणे आवश्यक असल्याने नगरपरिषद कार्यालयात इच्छुक उमेदवार व त्यांच्यासाठी सूचक, अनुमोदक यांनीही कर भरणा करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. काही सूचक आणि अनुमोदक तर उमेदवारांकडूनच थकीत कर भरणा करून घेत आहेत.
