नागपूर : जिल्ह्यात कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबेच्या अश्विन नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदात व उत्साहात सुरुवात झाली आहे. दोन वर्षानंतर दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांच्या सकाळपासून रांगा लागतात. गेल्या तीन दिवसांपासून हा परिसर ‘जय माता दी’ जयघोषाने निनादत आहे.

करोनामुळे मागील दोन वर्षे नवरात्र उत्सवात निर्बंध असल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद होते. मात्र, यावेळी सर्वच निर्बंध हटवण्यात आल्यामुळे मंदिर परिसरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात सकाळपासून गर्दी करत आहेत. नागपूरपासून २० किमी असलेल्या कोराडी येथे महालक्ष्मी जगदंबा संस्थान असून नवरात्र उत्सवात या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यामुळे प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. कोराडी देवी परिसर पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करण्यात आल्यामुळे या देवस्थानाला महत्त्व आले आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी होते. रांगेमध्ये लागून भाविक दर्शन घेत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून परिसर सुशोक्षित करण्यात आला आहे. ठिकठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. मंदिर परिसराची स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आदींना प्राथमिकता दिली जात आहे. सर्वसाधारण भाविकांना दर्शन घेताना अडचण येऊ नये म्हणून उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या अतिविशेष लोकांना दर्शन घेण्यासाठी वेगळे प्रवेशद्वार करण्यात आले आहे. आजीवन अखंड ज्योतीच्या पासधारकांसाठी वेगळे प्रवेशद्वार तर देणगी शुल्क देऊन विशेष अतिथींच्या प्रवेशासाठी वेगळे प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात मंदिर दररोज २२ तास भाविकांसाठी खुले राहणार आहे.