नागपूर : प्रेमविवाह झाल्यानंतर गर्भवती पत्नीच्या चारित्र्यावर पती संशय घेत होता. मेडिकल रुग्णालयात पत्नीची प्रसूती होताच दोन दिवसांच्या बाळाला निष्ठूर पित्याने खाली आपटून ठार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. गिरीश महादेव गोंडाणे (३२, सावरडी, जि. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश गोंडाणे आणि प्रतीक्षा हे सारवडी गावात शेजारी राहत होते. प्रतीक्षाला गिरीशने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या कुटुंबीयांना लग्नाची मागणी घातली. तिच्या आईवडिलांनी नकार दिला. त्यामुळे गिरीशने प्रतीक्षाला पळवून नेऊन प्रेमविवाह केला. मात्र, गिरीशचा स्वभाव संशयी होता. काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. परंतु, त्यात तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. कुण्या शेजाऱ्याशी बोलल्यास अनैतिक संबंध असल्याचा आरोप घेऊन तिला मारहाण करीत होता.

हेही वाचा >>> नववर्षाच्या पहिल्याच दिवशी युवकाला चाकू, तलवारीने भोसकले

गर्भवती असलेली प्रतीक्षा गेल्या तीन दिवसांपूर्वी नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. शनिवारी गिरीश हा रुग्णालयात आला. त्याने ‘हे बाळ माझे नाही… सांग कुणाचे पाप पोटात ठेवले होते’ अशी विचारणा करीत प्रतीक्षाला मारहाण केली. त्यानंतर दोन दिवसांच्या बाळाला बेडवरून उचलून ठार करण्याच्या उद्देशाने फरशीवर आपटले. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले व अजनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी प्रतीक्षाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून गिरीशला अटक केली. नवजात बाळावर उपचार सुरू असून त्याची प्रकृृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband doubts character pregnant wife child birth attempt to kill nagpur news adk 83 ysh
First published on: 02-01-2023 at 09:15 IST