अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्र्यांची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर कार्यव्यस्तता वाढल्याने कुटुंबाला वेळ देता येत नसल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे व ती त्यांनी बोलूनही दाखवली. रोज फक्त चार तास झोप घेणाऱ्या फडणवीस यांना मुलीसाठी रोज अर्धा तास देण्याचा प्रयत्न असतो, चित्रपट पाहण्याचा छंद असूनही वेळेअभावी तीन वर्षांत ते शक्य झाले नाही, असे ते सांगतात.

रामगिरीवर आयोजित दिवाळीमिलन कार्यक्रमात फडणवीस यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रथमच पत्रकारांना सपत्नीक निमंत्रित करण्यात आले होते. तीन वर्षांत एक तरुण, तडफदार मुख्यमंत्री म्हणून आपल्या कामाची छाप सोडणारे मुख्यमंत्री  म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. मूळचे नागपूरकर असलेले फडणवीस यांना या कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. कौटुंबिक गप्पाही केल्या. मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि नंतर झालेला दिनचर्येतील बदलही त्यांनी सांगितला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री होण्यापूर्वी कुटुंबाला वेळ देता येत होता, मुलीचा अभ्यासही घेता येत होता. मात्र, मुख्यमंत्री झाल्यापासून कार्यव्यस्तता वाढली. मी रोज फक्त चार तास झोप घेतो, मुलीसाठी रोज अर्धा तास देण्याचा प्रयत्न करतो, मात्र तिचा अभ्यास आणि इतर बाबींसाठी वेळच उरत नाही, तिची आईच या सर्व बाबींकडे लक्ष देते. नागपूरमध्ये असताना सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याची संधी मिळत होती. मात्र, आता तीन वर्षांपासून एकही चित्रपट बघितला नाही. सामान्य माणूस म्हणून हॉटेलमध्ये जाऊन जेवणे व इतर कार्यक्रमांना जाणे शक्य होत नाही, लोक फोटो काढतात आणि ते वेगळ्या पद्धतीने समाज माध्यमांवर टाकले जातात, कधीकधी त्यातून टीकेलाही तोंड द्यावे लागते, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

संवेदनशीलतेचा तोटाही

अलीकडच्या काळात राज्यभरात वाढलेले निदर्शने आणि आंदोलने याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आम्ही संवेदनशील आहोत, असे असण्याचे काही तोटेही आहेत. काही तरी मिळेल, या आशेने लोक आंदोलन करतात, आम्ही त्यांचे ऐकून घेतो, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो, आणखी पदरात पडावे म्हणून पुन्हा पुन्हा आंदोलने केली जातात. अनेक वर्षे प्रलिंबित असलेला अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आम्ही याच भावनेने सोडवला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I have not seen any movie from last three year says devendra fadnavis
First published on: 23-10-2017 at 05:06 IST