अकोला : राज्यात बियाणे उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात (महाबीज) सनदी अधिकाऱ्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते. या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर राहण्यात अधिकाऱ्यांची उदासीनता असून गत १५ वर्षांच्या काळात तब्बल २१ अधिकारी आले आणि बदलीवर दुसरीकडे गेले. एक अपवाद वगळता कुणीही दोन वर्षांचा कार्यकाळ सुद्धा पूर्ण केलेला नाही. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांची ११ महिन्यातच वाशीम येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर वाशीमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना पाठविण्यात आले. सनदी अधिकाऱ्यांना हे पद का नकोय? यावरून आता चर्चा होत आहे.
राज्याचे मुख्यालय अकोला येथे असलेल्या महाबीजची स्थापना २८ एप्रिल १९७६ रोजी झाली. बियाणे उत्पादन, प्रमाणीकरण, बियाणे गुणवत्ता नियंत्रण, बियाणे प्रक्रिया, हाताळणी, पॅकेजिंग, बियाणे विपणन, बियाणे विक्री आदी कार्य महाबीजमध्ये होते. महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. वरिष्ठ ‘आयएएस’ या पदावर काम करण्यास इच्छुक नसतात. या पदावर काम करण्यात ‘कमी’पणाची भावना असल्याने अधिकाऱ्यांचे इतरत्र बदलीसाठी प्रयत्न असतात. नव्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच त्यांची बदली होत असल्याचा प्रत्यय गेल्या दीड दशकात वारंवार आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक हे प्रवाहाबाहेरील पद असल्याचा समज असून यावर बदली म्हणजे कमी महत्त्वाची जबाबदारी दिल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये असते, अशी चर्चा आहे. शिवाय महाबीजचे मुख्यालय अकोला असल्याने याठिकाणी येण्यास अधिकारी इच्छूक नसतात. त्यामुळे या पदावर नियुक्ती होताच अधिकाऱ्यांचे बदलीसाठी प्रयत्न सुरू होतात.
महाबीजच्या ४९ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत ३६ अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालकपदावर नेमणूक झाली. टी. बालारमण महाबीजचे पहिले ‘एम.डी.’ होते. पुढील काळात या पदावर अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी कार्य केले. व्ही.एस. धुमाल, डॉ. प्रदीप व्यास या अधिकाऱ्यांनी चार वर्षांचा, तर सौरभ विजय यांनी तीन वर्षे १० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. २०१० नंतर महाबीजच्या ‘एम.डी.’ पदावर अधिकारी फारसे रमले नाहीत.
गेल्या १५ वर्षांमध्ये तब्बल २१ वेळा विविध अधिकारी व्यवस्थापकीय संचालक पदावर लाभले. यामध्ये बहुतांश वेळा अधिकाऱ्यांची बदलीवर महाबीजच्या ‘एम.डी.’ पदावर नेमणूक झाती, तर काही वेळा अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार होता. या कालावधीत अनिल भंडारी यांनी दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला. इतर बहुतांश अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यापासून ८-१० दिवसांपासून ते दीड वर्षांपर्यंतच्या कार्यकाळात इतरत्र बदली करून घेतली. १७ सप्टेंबर २०२४ पासून कार्यरत योगेश कुंभेजकर यांची वाशीम जिल्हाधिकारी पदावर बदली झाली. त्यांच्या जागेवर वाशीमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना देण्यात आले. २१ ऑगस्टला त्या पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण महाबीजला कार्यकाळ पूर्ण करणारा अधिकारी मिळत नसल्याने नफ्यात चालणाऱ्या संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.
प्रशासनाच्या प्रक्रियेतील भाग
बदली हा प्रशासनाच्या प्रक्रियेतील एक भाग आहे. महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदात अधिकाऱ्यांना स्वारस्य नाही, असा कुठला भाग नाही, असे कृषी विभागाचे प्रधान सचिव तथा महाबीजचे चेअरमन विकास रस्तोगी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले.