‘आयसीएमआर’च्या पोर्टलमध्ये बिघाड, नोंदी विस्कळीत

नागपूर : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पोर्टलमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शनिवारी जिल्ह्यात केवळ ९ नवीन करोनाग्रस्त नोंदवले गेले. प्रत्यक्षात ही संख्या जास्त होती. उपराजधानीतील मध्यवर्ती कारागृहातही करोनाने शिरकाव केल्याचे शनिवारी पुढे आल्याने चिंता वाढली आहे.

मध्यवर्ती कारागृहात चार दिवसांपूर्वी १२ कैद्यांचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात चौघांना करोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुमारे ५० जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यातीलही ५ जणांमध्ये करोनाचे निदान झाले. सगळ्यांना सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारपासून आयसीएमआरच्या पोर्टलमध्ये तांत्रिक दोष उद्भवला. पोर्टलला अपडेट करण्याचे काम हाती घेतले गेले आहे. त्यामुळे बऱ्याच चाचणी प्रयोगशाळांना करोनाग्रस्तांच्या नोंदी करता येत नव्हत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोंदीच होत नसल्याने शनिवारी शहरात ८ आणि ग्रामीणला १ अशा केवळ ९ रुग्णांच्याच नोंदी होऊ शकल्या. त्यामुळे या पोर्टलची दुरूस्ती झाल्यावर अचानक रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख १६५, ग्रामीण १ लाख ६८ हजार ४९४, जिल्ह्याबाहेरील ९ हजार ९९६ अशी एकूण ५ लाख ७८ हजार ६५५ रुग्णांवर पोहचली आहे. दिवसभऱ्यात शहरात केवळ ३५४, ग्रामीणला ४०८अशा एकूण केवळ ७६२ चाचण्या झाल्या. दरम्यान, महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर तांत्रिक समस्या उद्भवल्याने कमी रुग्णांच्या नोंदी झाल्याचे मान्य केले.