महेश बोकडे

नागपूर : वादळी हवा, अतिवृष्टी, दाट धुक्यामुळे चालकाला स्पष्ट दिसत नसेल तर रस्त्याच्या डाव्या बाजूला, सुरक्षिततेची काळजी घेत ‘एसटी’ बस लगेच उभी करा, असे आदेश ‘एसटी’ महामंडळाने २० जुलैला राज्यातील सगळय़ा विभाग नियंत्रकांना दिले. इंदूर-अमळनेर मार्गावरील अपघातात १२ व्यक्तींच्या मृत्यूनंतर महामंडळाने हे आदेश दिले.

राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. त्यानंतर विलंबाने हा आदेश निघाला. या आदेशानुसार, रस्त्याच्या कडेचा भराव अथवा कडा भुसभुशीत नाही, याची खात्री करूनच वाहन उभे करा. रस्ता स्पष्ट दिसल्यावरच पुढे मार्गस्थ व्हा. चालकांनी वाहन चालविताना सुरक्षिततेची खात्री करून घ्यावी. रस्त्याच्या कडेचा भराव वा कडा भुसभुशीत होण्याची शक्यता असल्याने, वाहन एकदम रस्त्याच्या कडेच्या बाजूने चालवणे धोक्याचे आहे. त्यामुळे सुरक्षिततेची खात्री करून सावकाशपणे वाहन बाजूला घेत, समोरून येणाऱ्या वाहनाला मार्ग करून द्यावे. पावसाळय़ात आपल्या पुढे असलेल्या वाहनास अतिवेगात ओलांडून जाण्याचे टाळावे. मार्गावरील पुलाच्या फरशीवरून पाणी वाहत असल्यास आपले वाहन कोणत्याही परिस्थितीत पुढे नेऊ नये. तसे कुणी केल्यास त्याची गंभीर नोंद घेतली जाईल. एसटी निघण्यापूर्वी ती रस्त्यावर जाण्यास सर्वतोपरीने योग्य आहे की नाही, ही तपासणी सर्व स्तरांवर आगारांमध्ये केली जावी. चालकांच्या बैठका घेऊन अपघात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रबोधन करावे. याबाबत स्वतंत्र नोंदवही ठेवून चालक-वाहकांना सूचना दिल्याची नोंद घेण्याबाबतही सगळय़ा विभाग नियंत्रकांना सांगण्यात आले आहे.

महामंडळाने हे आदेश राज्यातील सगळय़ा विभाग नियंत्रक कार्यालयाला २० जुलैला पाठवले आहेत. हे आदेश मिळाल्याच्या वृत्ताला नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

‘पुलांवर वेगमर्यादेचे पालन करा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटरस्ता, नदीवरील पुलावर व अरुंद रस्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत घाई न करता वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालवू नये. धोकादायक पद्धतीने समोरील वाहनास ओलांडून (ओव्हरटेक) जाऊ नये व सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दिलेल्या वेगमर्यादा पाळण्याबाबत चालकांना सूचना देण्याचेही आदेश महामंडळान दिले आहेत.