वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या ५ वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांच्या उमेदारीवरून संभ्रम निर्माण झाला असून उमेदवारी अर्ज भरायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना पक्षाकडून त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भावना गवळी यांना उद्या सायंकाळपर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा शिवसेना वाशिम जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत तसा ठराव घेऊन विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. मागील २५ वर्षांपासून वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या महिला नेतृत्वावर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी भावना गवळी यांच्या विरोधात खोटे सर्व्हे करून तिकीट कापण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप महादेव ठाकरे यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा यांना महायुतीतील घटक पक्षांचाच विरोध असतानाही तिकीट दिले जाते, मात्र भावना गवळी यांचे हेतुपुरस्सर खच्चीकरण केले जात आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – बुलढाण्यात महायुतीत महाफूट, भाजप लोकसभा प्रमुखांचे बंड; उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आढावा बैठकीदरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत जिल्हाप्रमुखांना उमेदवारीसंदर्भात प्रश्न केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकारी यांनी खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी पालकमंत्री संजय राठोड यांची देखील उपस्थिती होती. पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील भावना गवळी यांना समर्थन दिले असून विरोधकांकडून खोटी माहिती पसरवून खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप केला. दरम्यान, भावना गवळी यांच्या व्यतिरिक्त कुणीही या मतदारसंघात निवडून येणार नाही त्यामुळे शिवसेनेचे व महायुतीचे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ भावना गवळी यांच्या नावाची घोषणा करावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.