अकोला : एका संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात तब्बल तीन महिन्यानंतर अकोट शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोट शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी गोवर्धन हरमकर याला अटक केली. त्यानंतर १६ जानेवारीला सुकळी गावात आणत घराची झडती घेऊन त्याचे काका सुखदेव हरमकर यांनाही ताब्यात घेतले. त्याच दिवशी रात्री दोघांनाही पोलीस ठाण्यात जबर मारहाण करण्यासह पार्श्वभागात दांडा टाकण्याचे अमानूष कृत्य पोलिसांनी केल्याचा धक्कादायक आरोप आहे. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने गोवर्धन याला पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा…तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक्स-रे आणि वैद्यकीय अहवालामध्ये त्याच्या छातीची हाडे तूटली होती, असा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणी अकोट पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली होती. मृताचे काका सुखदेव हरमकर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे या गंभीर प्रकरणाची तक्रार दाखल केली. त्याची दखल घेऊन या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली. दरम्यान, अकोट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पोलीस अधीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश जावरेसह चंद्रप्रकाश साळुंखे नामक कर्मचाऱ्याला निलंबित केले. प्रकरणाचा तपास बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांच्याकडे दिल्यानंतर मंगळवारी रात्री मृतकाच्या वैद्यकीय अहवालानुसार उपनिरीक्षक जावरेसह तीन पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ‘सीआयडी’मार्फत केला जाणार असल्याची माहिती आहे.