नागपूर : अवकाळीचा फेरा परतला असताना आता पुन्हा उन्हाची दाहकता वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्याही पलिकडे पोहोचले आहे. उष्णतेच्या लाटांनी साऱ्यांनाच हैराण केले आहे. सकाळी आठ-नऊ वाजेनंतरच सूर्य आग ओकताना दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. आता अवकाळी पावसाचा धोका टळला असला तरीही उष्णतेच्या लाटेचे नवे संकट घोंगावत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे आरोग्य विभागानेही नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, कोकणाव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेचा “येलो अलर्ट” देण्यात आला आहे.

हेही वाचा…अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा

राज्यातील जळगाव, नाशिक, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांना उष्णतेचा “रेड अलर्ट” देण्यात आला आहे. तर दुसरीकडे नांदेड, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, आणि विदर्भातील काही जिल्हांना हवामान खात्याने उष्णतेचा इशारा दिला आहे. विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये अजूनही ढगाळ वातावरण आहे. तरीही उष्णतेचा दाह मात्र वाढतच चालला आहे. त्यामुळे उष्णतेपासून तूर्तास दिलासा नाही हेच आता स्पष्ट आहे.