अकोला : एकेकाळी महायुतीमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आता सूर बदलले आहेत. भाजपसोबत युती करणे ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त करून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. आगामी काळात महाविकास आघाडी सोबत जाण्याचे संकेत देखील त्यांनी दिले.
अकोल्यातील एका बैठकीसाठी महादेव जानकर आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत त्यांच्यासोबत जाणे चुकीचेच असल्याचे सांगितले. सर्व विरोधकांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पूर्वीचा तत्व, निष्ठा जपणारा भाजप आता राहिलेला नाही. इतर पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणायचे आणि पक्ष मोठा करायचा, हेच आता भाजपचे धोरण झाले आहे. आता भाजपची काँग्रेस झाली, अशी टीका महादेव जानकर यांनी केली. भाजपला पराभूत करण्यासाठी कोणाशीही युती करण्यासाठी आपण तयार असल्याचे देखील ते म्हणाले.
‘स्थानिक’ निवडणुकीत इतर पक्षांशी युतीची तयारी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष शक्य त्या ठिकाणी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, मनसे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास तयार आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी भविष्यात राजू शेट्टी, बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्ष यासह रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही, त्या ठिकाणी पक्ष स्वबळावर लढणार आहे. त्या दृष्टीने पक्षाची तयारी सुरू असून पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असे महादेव जानकर म्हणाले. २०२९ मध्ये लोकसभा लढणार असून यापुढे केंद्राच्याच राजकारणात सक्रिय राहणार आहे. केंद्र शासनामध्ये आगामी काळात मंत्री होणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीत मोठे यश मिळेल
आपल्यामुळे आपली बहीण पंकजा मुंडे कधीही अडचणीत येणार नाही, हा आपला प्रयत्न आहे. आधी निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आपला राजकीय संघर्ष उद्धव ठाकरेंशी होत असायचा. आता उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि काँग्रेस एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहोत. त्याचा मोठा फटका सत्ताधारी पक्षांना बसेल. आम्हाला या निवडणुकीत मोठे यश मिळणार असल्याचा दावा देखील महादेव जानकर यांनी केला. महादेव जानकर यांचे वक्तव्य व दाव्यांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.