अकोला : दिव्यांचा सण दिवाळीनिमित्त कोट्यवधी रूपयांचे फटाके उडवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पनेला ‘फटाके’ लागले असून, कर्णकर्कश आवाज व धुरामुळे आरोग्यासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला. दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणारी आतषबाजी होत आहे. दिवाळीला आनंदोत्सव साजरा करताना दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे फटाके उडवण्यात येतात. या फटाक्यांमुळे पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे फटाक्यांविरुद्ध विविध स्तरावर मोहीम राबविण्यात येते. ही जनजागृती मोहीम थंडावल्याचे चित्र यावर्षी दिसून आले.

फटाक्यांमधून निळा, पिवळा, हिरवा, लाल, जांभळा रंग निघण्याकरिता अॅल्यूमिनिअम, अॅन्टमनी सल्फाईड, बेरियम नायटनेट, तसेच तांबे, शिसे, लिथियम, स्टनॅन्शयम, अर्सेनिक यासारख्या घटकाचा वापर केला जातो. फटाके फोडल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे अनेक दुर्धर व्याधी होतात. गर्भात असलेली मुले व नवजात मुलांना तर हा अधिकच घातक. यासोबतच एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनेक किटक, किडे नाश पावतात. आग लागणे, मुले भाजण्याचे प्रकार घडतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करून लक्ष्मीपूजनाला फटाके फोडण्याचा मनमुराद आनंद नागरिकांनी लुटला. दिवाळीमध्ये मोठ्या आवाजात फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांना नुकसान पोहचते. त्यामुळेही फटाके कमी प्रमाणात फोडण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही.

हेही वाचा : चंद्रपूर : अनधिकृत बॅनर, होर्डिंग्सचा सुळसुळाट; …तर व्यावसायिकांना जबाबदार धरणार

अभ्यंगस्नानापासून सुरु झालेली आतषबाजी रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. काहींनी नियम डावलून रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याचा आनंद घेतला. प्रकाशमय दिवाळी साजरी करताना आपण प्रदुषणाची काळी सावली तर गडद करत नाही ना, हे पाहणे महत्त्वाचे आहे. फटाके हे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक डेसिबलचे आणि आरोग्यावर कायमस्वरूपी परिणाम करणारे आहेत. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करणे शक्य नाही. मात्र, आनंद देणाऱ्या फटाक्यांमधली स्फोटके त्यांचा धोका वेळीच ओळखले तर दिवाळीचा निरधास्तपणे आनंद लुटता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा : बहिणींच्या आयुष्यात प्रकाशदीप उजळण्यासाठी बांधील, आमदार रोहित पवारांनी केले आश्वस्त

फटाके फोडण्याची रंगली स्पर्धा

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या या फटाक्यांमुळे लहान बालके, रुग्ण, अबाल वृद्ध आणि पशु पक्षी यांच्यासह पर्यावरणालाही हानी पोहोचत आहे. मात्र, फटाके फोडण्याच्या स्पर्धेत याचा विचार होत नाही. आता फटाके फोडण्याची स्पर्धा रंगत असल्याने उत्सवाचे स्वरूप विद्रूप होत चालले आहे. फटाक्यांमुळे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतात, हे माहीत असूनही मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात येत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही स्पर्धा दिसून येते.

हेही वाचा : नागपूर: शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा मृत्यू; आशा रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मर्यादा ओलांडताहेत फटाके

दिवाळीतील फटाक्यांचा आवाज रक्तदाब वाढवू शकतो. कायमचे बहिरेपण ही येऊ शकते. सुतळी बॉम्ब किंवा पॅरेटबॉम्ब सारखे फटाके १२० डेसिबल आवाजाची मर्यादा ओलांडतात. मानवी कानांची ग्रहणक्षमता कमाल १२५ डेसिबल इतकी आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार फटाक्यांना आवाजाची मर्यादा ९० डेसिबल इतकी घालून देण्यात आली आहे. शांतता क्षेत्रात आवाजाची मर्यादा ५० डेसिबल आहे. मात्र, शांतता क्षेत्रातील आवाजाची पातळी सर्रास ओलांडली जाते. आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांची उंची राहत असल्याने, इमारतीत वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या रहिवाशांना १२० डेसिबलपेक्षाही मोठा आवाज सहन करावा लागत आहे.