अकोला : अत्यंत दुर्मीळ ‘मांडूळ’ जातीचा साप एका शेतात आढळून आला होता. सर्पमित्रांनी त्याला पकडून जंगलात सोडून दिले. अकोला शहरापासून जवळ असलेल्या भाकराबाद (मोरगाव भाकरे) येथील धीरज पाटील यांना शेतात साप दिसला. त्यांनी शेतातील गुरांच्या टिनशेडमध्ये साप असल्याची माहिती सर्पमित्रांना दिली. सर्पमित्र सुरज इंगळे, सुरज ठाकूर, अभय निंबाळकर यांनी त्वरित घटनास्थळी पोहचून मांडूळ सापाला पकडले. हा साप तीन फूट लांबीचा होता. या मांडुळ सापाची वन विभागात नोंदणी करून पातूर वन परिक्षेत्रात सोडून देण्यात आले. दुर्धर आजारावरील औषंधासाठी तसेच गुप्त धनाच्या शोधासाठी मांडूळ जातीच्या सापाची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी होते.

हेही वाचा : गोंदिया : अवैध सागवान वृक्षतोडप्रकरणी सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी जाधव व क्षेत्रसहाय्यक पठाण निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांडूळ सापाची मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव असून तो बिनविषारी आहे. अंधश्रद्धेमुळे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे मांडूळ सापाची प्रजाती धोक्यात आली आहे. वास्तविक मांडूळ उपद्रव नसणारा बिनविषारी साप आहे. त्याच्या मातीमिश्रीत विष्टेमुळे जमीन सुपिक व भुसभुशीत होत असल्याने शेती पिकाच्या उत्पादनात वाढ होत असल्याने मांडूळाला शेतकऱ्याचा मित्र संबोधले जाते, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली.