अकोला : सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारपेठेतील मालाच्या पडलेल्या भावामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता अधिक असताना नाफेडकडून प्रतिहेक्टरची मर्यादा लादण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली. जिल्ह्यात हेक्टरी सरासरी १४ क्विंटल उत्पादन असताना केवळ ५.९० क्विंटलची खरेदी नाफेडकडून करण्यात आली आहे. उर्वरित सोयाबीन कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात पिकांची परिस्थिती चांगली नाही. अवकाळी, अतिवृष्टी व पावसाच्या खंडाचा पिकांवर दुष्परिणाम झाला. या संकटाला तोंड देत शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा होतो. सोयाबीनचा प्रतिक्विंटल हमीभाव चार हजार ६०० असताना सुरुवातीच्या काळात सोयाबीनने पाच हजाराचा टप्पा ओलांडला होता. भाव यापेक्षाही वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले. मात्र, गेल्या महिनाभरापासून सोयाबीनचे भाव चार हजारांपर्यंत खाली घसरले. हमीभावापेक्षाही कमी दराने बाजारात त्याची मागणी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मंगळवारी चार हजार ०५० ते चार हजार ४६५ रुपये भाव मिळाला.

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

हेही वाचा : नागपूर : दोन कोटींच्या गांजासह तस्कराला अटक

दरम्यान, नाफेडकडून हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश आले. मात्र, अकोला जिल्ह्यात प्रति हेक्टरी ५.९० क्विंटल सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणखीच अडचणीत सापडला. बाजारात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा बरेच खाली गेल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता कमी दाखवण्यात आल्याने नाफेडकडून खरेदीची मर्यादा लादण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पंचायत झाली. नाफेडमार्फत जिल्ह्यात दहा केंद्र कार्यरत करण्यात आले असून त्या ठिकाणी आज, ६ फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत नोंदणी करण्यात आली. ही मुदत वाढवून देण्यात यावी आणि प्रतिहेक्टरी खरेदी करण्याची मर्यादाही वाढवण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

गोषवारामध्ये प्रतिहेक्टरी १४ क्विंटल उत्पादन

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पीक कापणी अहवालानंतर जो गोषवारा सादर केला, त्यात जिल्ह्यातील सोयाबीनची उत्पादकता प्रतिहेक्टरी १४ क्विंटल दर्शवलेली आहे. अकोट, तेल्हारा तालुक्यात तर ही उत्पादकता हेक्टरी १७ क्विंटलपर्यंत आहे. तरीही नाफेडकडून अत्यल्प सोयाबीन खरेदीचे आदेश असल्याने त्याचा लाभ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : नागपूर : पगार रखडल्याने पोलीस कर्मचारी उसनवारीवर

“नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात आली. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार हेक्टरी ५.९० क्विंटलची खरेदी केली. मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच आणखी खरेदी केली जाईल. नाफेडच्या खरेदीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.” – पी.एस. शिंगणे, जिल्हा विपणन अधिकारी, अकोला.

“नाफेडकडून प्रतिहेक्टरी ५.९० क्विंटल सोयाबीन खरेदीचे आदेश मागे घेऊन त्याऐवजी हेक्टरी १४ क्विंटल सोयाबीन खरेदीचे आदेश देण्यात यावेत. नाफेडच्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देखील देण्यात यावी.” – ॲड. सुधाकर खुमकर, अध्यक्ष, बेलखेड फार्मर प्रोड्युसर कंपनी.