अमरावती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी एका कार्यक्रमात महिलांविषयी केलेले आक्षेपार्ह वक्‍तव्‍य सध्‍या चांगलेच चर्चेत आले आहे. आमदार देवेंद्र भुयार म्हणाले, तरूण मुलगा शेतकरी असेल, तर त्‍याला लग्‍नाला कुणी मुलगी देत नाही, अशी परिस्थिती आहे. एक नंबर स्मार्ट, देखणी मुलगी हवी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्यांना भेटत नाही, ती नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची मुलगी ही कुणाचा छोटा-मोठा व्यवसाय असेल, किराणा दुकान असले, तर त्याला मिळते अन् तीन नंबरचा जो गाळ गाळ शिल्लक राहते… ती पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते. म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचे काही खरे राहिले नाही. शेतकऱ्याचे जन्माला येणारे जे लेकरू आहे ते हेबंळ्ळ हांबळ्ळच निघत राहते. मायं इल्लू पिल्लू अन् त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे आपला सगळा, असे देवेंद्र भुयार म्हणाले. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्‍तव्‍यावर संताप व्‍यक्‍त केला जात असून राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्‍या उपनेत्‍या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र भुयार यांच्‍यावर टीका केली आहे. त्‍या म्‍हणाल्‍या, भुयार यांचे वक्तव्य हे केवळ महिलांची अपमान करणारे आहे असे नाही. हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची टिंगल उडवण्यासारखे आहे. परंतु सध्या शिंदे गट, अजित पवार गटांचे लोक बोलण्याचे तारतम्य पाळत नाही. यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी आम्हाला पोलिस किंवा कुणी काहीही शिक्षा किंवा कारवाई करू शकत नाही. या मस्तवालपणातून हे वक्तव्य होत आहे.

हेही वाचा : धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; नागपूरच्या मोवाड गावातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी एका सभेत त्‍यांनी महिलांसोबत वाद घालून बाहेर निघून जाण्‍याचे फर्मान सोडले होते, त्‍याचीही चर्चा रंगली होती. देवेंद्र भुयार हे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचे समर्थक समजले जातात. १ सप्‍टेंबर रोजी अजित पवार यांच्‍या वरूड येथील महासन्‍मान यात्रेला उपस्थित राहण्‍यासाठी महिलांना दमदाटी करण्‍यात आल्‍याचा आरोपही देवेंद्र भुयार यांच्‍यावर करण्‍यात आला होता. अजित पवारांच्या महासन्मान यात्रेला उपस्थित राहण्यासाठी महिलांना दमदाटी करण्‍यात आल्याचा गंभीर आरोप भाजपच्या अर्चना मुरूमकर यांनी केला होता. अजित पवारांच्या यात्रेला उपस्थित न राहिल्यास आशा, स्वयंसेविका, गटप्रवर्तिका तसेच बचत गटांच्या महिलांवर कारवाई करू, असे फोन महिलांना करण्‍यात आल्याचे मुरूमकर यांचे म्‍हणणे होते.