भंडारा : जवाहरनगर परिसरातील सालेबर्डी ( खैरी) ते कोरंभी रस्त्यावरील पंडित नाला पुलाखालील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नयन मुकेश खोडपे (२३, रा. पांढराबोडी) असे मृतकाचे नाव आहे. हातपाय दोरीने बांधले असून गळ्यात दुप्पटा व मानेवर, पोटावर जखमा असल्याने तरुणाची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जवाहरनगरजवळील सालेबर्डी (खैरी) येथील उपसरपंच जितेंद्र गजभिये हे मोटारसायकलने काही कामानिमित्त कोरंभी मार्गे भंडार्‍याला जात असताना कोरंभी रस्त्यावरील पंडित नाल्यावर लघुशंकेकरीता थांबले. त्यांना पुलाखाली नाल्यातील पाण्यात एका युवकाचे प्रेत तरंगतांना दिसून आले.

हेही वाचा : पश्चिम विदर्भात रब्बीची पेरणी संथगतीने, केवळ ३६ टक्के क्षेत्रात पेरा; तेलबियांकडे शेतकऱ्यांची पाठ

याची माहिती सालेबर्डी पोलीस पाटील हिरालाल पुडके व टोमदेव तितिरमारे यांच्यासह जवाहरनगर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी स्थानिक आणि कोळी बांधवांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृताचे हात-पाय दोराने बांधल्याचे दिसून आले. गळासुद्धा आवळल्याचे तसेच मानेवर व पोटावर जखमा आढळून आल्या. सदर युवकाची हत्या करुन त्याचे हात-पाय बांधून नाल्यात फेकण्यात आले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. पांढराबोडी येथील नयन खोडपे हा २७ नोव्हेंबर रोजी रात्री मोटारसायकल घेऊन घरुन निघून गेला होता. खोडपे कुटुंबीयांनी २८ नोव्हेंबर रोजी नयन बेपत्ता असल्याची तक्रार वरठी पोलिसांत नोंदवली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे पाठवले.

हेही वाचा : ‘पोलिसांत नोकरी लावून देतो’, खोटी कागदपत्रे खरी असल्याचे भासवून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच ते सहा तरुण मारहाण करण्यासाठी आले होते

मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी नयनला मारहाण करण्यासाठी भंडारा येथील पाच ते सहा तरुण पांढराबोडी येथील शिवारात गेले होते. प्रेमप्रकरणातून त्याची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

हेही वाचा : अमरावती जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरमधील शेती पाण्यात

तहसील कार्यालय परिसरात आढळली मोटारसायकल

मृत नयन हा मोटारसायकलने २७ नोव्हेंबर रोजी घरुन निघून गेला होता. ती मोटारसायकल ३० नोव्हेंबर रोजी भंडारा तहसील कार्यालय परिसरात एका पानठेल्यामागे दिसून आली. ही मोटारसायकल तहसील कार्यालय परिसरात दिसून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.