भंडारा: जुन्या काळाच्या प्रमाणे जांभळाच्या आणि पळसाच्या पानांचा मांडव सजलेला, नवरदेवासाठी बोहला, सप्तपदी आणि रुखवंताची सुंदर आरास, मेहंदी समारंभ, हळदी समारंभ, चुडा भरणे असे विविध कार्यक्रम, रांगोळीच्या पायघड्या आणि ढोल ताशाच्या गजरात कृष्णदेवाच्या लग्नसोहळ्याची मिरवणूक. असा हा अनोखा श्रीकृष्ण तुळशी विवाह सोहळा भंडाऱ्यात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

पारंपरिक पोशाखातील महिलांनी विवाह गीतांवर नाचत सोहळ्याला रंगत आणली. अंतरपाट, अक्षता आणि पुष्पवर्षाव, फटाक्यांचे आतिशबाजी आणि शेवटी व्हराड्यांची पंगत. हा आगळा वेगळा श्रीकृष्ण तुळशी विवाह सोहळा भंडारा शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडला. उपस्थित सर्वांनी या तुळशी विवाहाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे सौंदर्य अनुभवले.

“श्री गजानन महाराज पारायण ग्रुप” यांच्या वतीने ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोरज मुहूर्तावर पारंपरिक विधी, मंगलाष्टके आणि आरत्यांच्या गजरात हा तुळशी विवाहाचा सोहळा अत्यंत थाटामाटात, वाजतगाजत आणि उत्साहात संपन्न झाला.

यावेळी पाहुण्यांनी घरुन आणलेले तुळशी वृंदावन व कृष्ण देवाला पाटावर ठेऊन मंत्रोच्चारात स्थापना करण्यात आली. नंतर मंगलाष्टकांच्या स्वरात श्रीकृष्ण-तुळशी मातेचे लग्न धुमधडाक्यात झाले.

शुभमंगल सावधानचे स्वर

कानी पडताच वधू-वरांवर अक्षता आणि पुष्पवर्षाव करण्यात आला. पारंपरिक वेशातील महिला आणि वऱ्हाडी मंडळींनी केलेला अखंड जयघोष आणि डोक्यावर कृष्णाची मूर्ती घेऊन काढलेली कृष्णदेवाची वरात अशा थाटात पारंपरिक पद्धतीने हा तुळशी विवाह सोहळा भंडाऱ्यातील शांतीनगर येथे पार पडला. यावेळी नातेवाईक, शेजारी व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात सणांच्या निमित्ताने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, हा यामागचा हेतू होता. भारतीय संस्कृतीची ओळख नवीन पिढीपर्यंत पोहोचावी, या हेतूने अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत राहावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आगयावेगळ्या पद्धतीने साजरा केलेला हा श्रीकृष्ण- तुळशी विवाह सोहळा लक्षणीय ठरला.

ॲड. प्राची महांकाळ, मीनाक्षी साकुरे, विजयता यादव, सुरेखा झंझाड, चित्रा लांजेवार, मीनाक्षी शेंडे, स्मिता कारेमोरे, सुनिता वंजारी, रीना हटवार, सुषमा वंजारी, मोहिनी सांबरे, शिल्पा बागडे यांच्यासह शैलेश नागापुरे, सारंग महाकाळ, नंदकिशोर झंझाड, नरेंद्र खोब्रागडे यांनी या सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता सक्रिय सहभाग नोंदवला. विवाह सोहळा नंतर सहभोजन करण्यात आले.