बुलढाणा : अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या विरुद्ध कारवाईसाठी घटनास्थळी गेलेल्या मंडळ अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण व अंगावर वाहन टाकणाऱ्या तीन आरोपींना बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ आर एन मेहेर यांनी आज हा निकाल दिला.

तत्कालीन मंडळ अधिकारी शैलेश गिरी हे बुलढाणा तहसील कार्यालयात कार्यरत होते. ९ मार्च २०१७ रोजी त्यांना राजीव गांधी मिलिटरी स्कूल जवळ अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली. यावेळी नायब तहसीलदार श्याम भांबळे यांच्यासह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस मदत मागविली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितले. मात्र दोन्ही चालकांनी ट्रॅक्टर व जेसीबी अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सतीश चिंतामण जाधव ( रा. कोलवड ) याने ट्रॅक्टर मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगावर घातला.

हेही वाचा : वसतिगृहे बांधून देण्याच्या बदल्यात महामेट्रोला कृषी विद्यापीठाची जागा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी त्याचे सहकारी जेसीबी चालक प्रमोद उबरहंडे, मदतनीस अमोल उबरहंडे यांनी पळ काढला. पोलीस नाईक महादेव इंगळे यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावरही जेसीबी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला . दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवीत आपला जीव वाचविला. शैलेश गिरी यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तीन आरोपींविरुद्ध भा.द.वी चे कलम ३०७ ,१८६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश ठाकूर यांनी तपास अंती दोषारोपपत्र विद्यमान न्यायालयात दाखल केले होते. सरकार तर्फे ११ साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सरकारतर्फे एड. सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रभावी बाजू मांडली. त्या आधारे न्यायाधीश राजेंद्र मेहरे यांनी तिन्ही आरोपींना १० वर्षाचा सश्रम कारावास तसेच प्रत्येकी दीड हजार रुपये दंडाची सुनावणी केली आहे.