चंद्रपूर: मद्य विक्रीत आघाडीवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याने १०५ टक्के उद्दिष्टपूर्ती करीत २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षात ३२ कोटी पेक्षा अधिकची दारू विक्री केली. यामध्येही विदेशी दारूच्या तुलनेत देशी दारू विक्रीत जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मद्यप्रेर्मीची पहिली पसंती ही देशी दारूच ठरली आहे. यावेळी देशीने विक्रीच्या बाबतीत विदेशीवर मात केली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल दोन कोटी नऊ लाख नऊ हजार ४०१ लिटर देशी दारूची, तर ६६ लाख ८० हजार १६८ लिटर विदेशी दारूची विक्री झाली आहे. तर देशी, विदेशी, बीअर आणि वाइन मिळून चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यप्रेमींनी ३ कोटी ३६ लाख ८७ हजार २१४ लिटर दारू रिचविली आहे.
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये देशी दारूची विक्री १२ टक्क्यांनी, तर विदेशी ११ टक्क्यांनी अधिक विकली गेली. एकूण दारूविक्रीचा विचार केला तर ३२ कोटी पेक्षा अधिकची दारू विक्री एका अर्थिक वर्षात झाली आहे. विशेष म्हणजे दारू पिणाऱ्यांची संख्या दररोज वाढत असल्याने दारूची विक्रीही वाढली आहे. काही वर्षांपूर्वी दारू पिणे वाईट मानले जात होते. दारूच्या व्यसनात अनेकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केल्याचे असंख्य उदाहरणे आहेत; पण अलीकडे बदलत्या जीवनशैलीत दारूला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. चंगळवादी संस्कृतीचे अनुकरण, वीक एंड पार्टीची वाढती क्रेझ, तरुणांची वाढलेली संख्या आणि वाढलेली दुकाने यामुळे दारू विक्रीत आणखी वाढ होत आहे. दारूविक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळत असला, तरीही हिच दारू अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करत असल्याचे वास्तव आहे.
३१ मार्च हा दारू विक्रेत्यांसाठी परवाना नूतनीकरणाचा शेवटचा दिवस होता. नूतनीकरणाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यातूनही मोठा महसूल मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्याला उद्दिष्ट्यपूर्तीसाठी मोठा हातभार लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षात ३० कोटी ३५ लाख रुपयांच्या महसूलचे उद्दिष्ट होते. चंद्रपूर जिल्ह्याने १०५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्हाला ३२ कोटी सहा लाख रुपयांचा महसूल गोळा झाला आहे.गतवर्षीच्या तुलनेत नऊ कोटी जास्त महसूल मिळाला आहे. सन २०२३ ते २०२४ या वर्षात २२.९८ कोटींचा महसूल झाला होता. यंदा त्यात नऊ कोटी आठ लाखांची भर पडली असून तब्बल ३२. ६ कोटींचा महसूल मिळाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्ट आपण १०५ टक्के पूर्ण केले आहे. या वर्षी मागील वर्षीपेक्षा ९.८ टक्के दारू विक्रीत वाढ झाली आहे. अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध कारवाईच्या अनुषंगाने आमचे भरारी पथक तैनात असून ते कारवाई करीत आहेत. त्यामुळे अवैध दारुविक्रीवर काही प्रमाणात अंकुश लागला. जिल्ह्यात दोन कोटी नऊ लाख नऊ हजार ४०१ लिटर देशी दारूची विक्री झाली आहे. मागील वर्षी १ कोटी २५ लाख ९३ हजार ६४७ लिटर विक्री झाली होती. ६६ लाख लिटर विदेशी : मागील वर्षीच्या तुलनेत ११ टक्याने वाढ होत ६६ लाख ८० हजार १६८ लिटर विदेशी दारूची विक्री झाली आहे. ५९ लाख लिटर बीअर : यंदा ५९ लाख ५० हजार ६१३ लिटर बीअर, तर एक लाख ४७हजार ३२ लिटर वाइनची विक्री झाली आहे अशी माहिती उत्पादन शुल्क अधिकारी नितीन धार्मिक यांनी दिली.