गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा १७ एप्रिल रोजी संध्याकाळी थंडावल्या. उद्या १९ एप्रिलला येथे मतदान होत आहे. राज्यातील भाजप-राष्ट्रवादी युतीचा परिणाम आता कार्यकर्त्यांवरही दिसून येत आहे. दोन्ही जिल्ह्यात महायुती होण्यापूर्वी एकमेकांच्या विरोधात लढलेल्या पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन झाले असले तरी बूथ कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत. अनेक शहरात आणि गावांत भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून…’ अशीच अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यात पारंपरिकदृष्ट्या विरोधी असलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची आता युती झाली आहे. प्रचारही झाला. मतदानाच्या एक दिवसआधी प्रत्येक पक्षाकडून बूथची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवली जाते. बूथ कार्यकर्ते पक्षाच्या आदेशानुसार कार्य करतात. याआधी एकमेकांच्या विरोधात बूथ लावून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम या कार्यकर्त्यांकडून केले जात होते. मात्र यावेळी बूथ नियोजन व खर्चाचे नियोजन करताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पंचाईत झाल्याचे पहावयास मिळत आहे.

हेही वाचा…नागपूरमध्ये उद्या मतदान, ८० कि.मी.वर मोदींची सभा

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर बूथ नियोजनाची जबाबदारी सोपवली असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरत आहे. गोंदिया जिल्ह्यात भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची वर्दळ, तर राष्ट्रवादी कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे ठीक आहे, पण आमचे काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.