नागपूर: प्रत्यक्ष मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी जाहीर प्रचार थांबवला जात असला तरी छुपा आणि अप्रत्यक्ष प्रचार सुरू असतो. यंदा अनेक टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे याच अनुषंगाने बघितले जाते. १९ एप्रिलला राज्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. यात नागपूरचा समावेश आहे. आणि त्याच दिवशी नागपूरच्या शेजारचा जिल्हा वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आहे.

विदर्भात लोकसभेचे १० मतदारसंघ आहेत. त्यापैकी पूर्व विदर्भातील नागपूरसह पाच मतदारसंघात पहिल्याच टप्प्यांत म्हणजे उद्या (१९ एप्रिलला) मतदान आहे. तर वर्धेसह उर्वरित पाच मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान आहे. नागपुरात प्रचार संपला मतदानासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली. शुक्रवारी सकाळी मतदानाला सुरुवात होईल. वर्धा लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान आहे आणि तेथे प्रचार शिगेला पोहोचला आहे.

हेही वाचा…अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’

नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यातील अंतर ८० किलोमीटर पेक्षा कमी आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मतदानाच्या दिवशी शेजारच्या वर्धा मतदारसंघात होणारी मोदींची प्रचार सभा नागपूरच्या मतदारांना प्रभावित करू शकते. मोदींची सभा सर्व वृत वाहिन्या, पोर्टल, समाजमाध्यमांवर लाइव्ह दाखवली जाते. हे येथे उल्लेखनीय. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे दुपारी ही सभा आहे. तेथून मोदी नागपूरला येणार असून येथे त्यांचा मुक्काम आहे.