लोकसत्ता टीम

चंद्रपूर : भाजपाने राजुरा मतदार संघातून माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ब्रम्हपुरीतून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे व वरोरा मधून माजी मंत्री संजय देवतळे यांचे सुपूत्र करण देवतळे यांना उमेवारी जाहीर केली आहे. दरम्यान बाहेरून राजुऱ्यात आलेल्या भोंगळे यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार ॲड.संजय धोटे व सुदर्शन निमकर तर देवतळेंच्या उमेदवारीने वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर नाराज झाले आहेत.

कॉग्रेसचे वर्चस्व असलेल्या राजुरा या कुणबी बहुल मतदार संघात भाजपने मूळचे घुग्घुस येथील रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांना उमेदवारी दिली आहे. कुणबी समाजातून येणारे भोंगळे बल्लारपूर मतदार संघातील नवेगांव येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. मागील दहा वर्षापासून ते आज ना उद्या राजुरा येथून उमेदवारी मिळेल या आशेवर या क्षेत्रात सक्रीय होते. वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनंटीवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या भोंगळे यांनी शुक्रवारी दिल्लीत भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेटही घेतली होती. त्यानंतरच्या घडामोडीत माजी मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर गटाचे माजी आमदार ॲड.संजय धोटे यांचे नाव मागे पडले व भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान एक दिवसापूर्वी माजी आमदार ॲड. संजय धोटे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने धोटे व निमकर गट नाराज झाले आहेत.

आणखी वाचा-गडचिरोलीत भाजपकडून विद्यमान आमदार होळींना डच्चू, डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी; ‘लोकसत्ता’चे भाकीत खरे ठरले

ब्रम्हपुरी मतदारसंघातून कृष्णलाल सहारे यांना भाजपाने संधी दिली आहे. जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती व उपाध्यक्ष अशी राजकीय कारकिर्द असलेले सहारे कुणबी समाजातून येतात. सहारे आमदार बंटी भांगडीया यांचे विश्वासू सहकारी आहेत. येथून माजी आमदार प्रा.अतुल देशकर उमेदवारीसाठी प्रयत्नरत होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रम्हपुरीत आयोजित कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते मुनगंटीवार यांनी प्रा.देशकर यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे जाहीर वक्तव्य केले होते. मात्र आता सहारे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने प्रा.देशकर नाराज झाले आहेत. सहारे यांचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या समोर टिकाव लागेल काय ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच ब्रम्हपुरीत कुणबी समाजाचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व भाजप आमदार परिणय फुके यांनी कुणबी समाजाचा एकच उमेदवार देवू असे जाहीर केले होते. कृष्णा सहारे यांची उमेदवारी याच पध्दतीने जाहीर झाल्याचीही चर्चा आहे. वरोरा मतदार संघातून माजी मंत्री संजय देवतळे यांचे सुपूत्र करण देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सलग वीस वर्ष काँग्रेस पक्षाचे आमदार व मंत्री राहिल्यानंतर काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने माजी मंत्री नाराज होवून भाजपात गेले होते. मात्र २०१९ मध्ये वरोरा मतदार संघ युतीत शिवसेनेकडे गेल्याने देवतळे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. करोना मध्ये त्यांचे दु:खद निधन झाल्यावर त्यांचे सुपुत्र करण देवतळे राजकारणात सक्रीय झाले. देवतळेंना उमेदवारी दिल्याने मनसे मधून दोन वर्षापूर्वी भाजपात दाखल झालेले व वरोरा विधानसभेचे प्रमुख असलेले रमेश राजूरकर यांना धक्का बसला आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे राजुरकर नाराज आहेत अशीही चर्चा आहे.

आणखी वाचा-प्रहारचे प्रदेशाध्यक्षच भाजपात… ऐन रणधुमाळीत बच्चू कडूंचे शिलेदार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपक्ष आमदार जोरगेवार यांचा आज भाजप प्रवेश

राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार यांनी नाकारल्यानंतर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार रविवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार समर्थक देवराव भोंगळे राजुरा येथून भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर जोरगेवार भाजपात दाखल होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. जोरगेवार यांचा भाजपा प्रवेश भोंगळे यांच्या उमेदवारीच्या तडजोडीवरच होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.