नागपूर : देशात संस्कृती, परंपरा रुजवण्याचे आणि ती जपण्याचे काम तळागाळातल्या लोकांनी केले. समाजातील उच्चभ्रू त्यावर मक्तेदारी दाखवत असले तरीही ते वास्तव नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले.
वनराई फाऊंडेशन व राम गणेश गडकरी प्रतिष्ठान यांच्यावतीने गिरीश गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘श्रीमदभगवद्गीता-एक चिकित्सा’ या विषयावर द्वादशीवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. धरमपेठेतील वसंतराव नाईक सभागृहात मंगळवारी आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गिरीश गांधी, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. द्वादशीवार यांच्या अलकनंदा, हाकुमी, तांदळा, अकरावती दुरुस्ती व स्मरण या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
देशातील संस्कृती, परंपरेचा पाया रामायण, महाभारत काळापासून तळागाळातील लोकांनीच जपला, हे सांगताना द्वादशीवार यांनी काही उदाहरणे दिली. अर्जुनाला गीतेचा उपदेश करणारे भगवान श्रीकृष्ण गवळी समाजाचे तर अर्जुन क्षत्रीय होता. महाभारत लिहिणारे व्यास कोळी समाजाचे होते. अविवाहित मातेच्या पोटी ते जन्माला आले होते. रामायण लिहिणारे वाल्मिकी देखील कोळीच होते. वेद लिहिणारे देखील कनिष्ठ समाजाचेच होते. त्यामुळे संस्कृती, परंपरा जपण्याचे खरे श्रेय या लोकांना जाते. उच्चभ्रुंकडून त्यावर केला जाणारा दावा ही वास्तविकता नाही, असेही द्वादशीवार म्हणाले.
आपल्यासमोर जी भगवद्गीता आहे ती ७०० श्लोक आणि १८ अध्यायांची आहे. ही शंकराचार्यांनी निवडलेली गीता आहे. भगवद्गीता हा ग्रंथ वेद, उपनिषदांपेक्षाही लोकप्रिय आहे. त्याची रचना, इतिहास यावर प्रत्येक विद्वानांनी भाष्य केले. शंकराचार्य ते गांधी अशा प्रत्येकांनीच त्यावर भाष्य केले. त्यावर सुमारे २५० भाष्य उपलब्ध असल्याचे प्रा. द्वादशीवार यांनी सांगितले. एवढी लोकप्रियता जगात कोणत्याही ग्रंथाला मिळालेली नाही. गीतेतून प्रत्येकाला त्याच्या काळानुसार अर्थ काढता आला. भगवद्गीता हा ग्रंथ देशाला, देशातील प्रत्येक नागरिकाला त्या-त्या काळानुसार, काळाच्या गरजेनुसार मार्गदर्शन करत आला आहे. त्यामुळे भगवद्गीतकडे गीता म्हणून नाही तर मार्गदर्शक गीता म्हणून पाहिले पाहिजे, असेही द्वादशीवार म्हणाले. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. नीलेश खांडेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
…म्हणून शंकराचार्यांना समाजाने दूर सारले
शंकराचार्यांमुळे या देशातला धर्म जिवंत राहिला. पण, त्यांच्या आयुष्याची किंमत काय तर शंकराचार्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडे कुणीही आले नाही. आईचा मृतदेह त्यांनी खांद्यावर नेला आणि त्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांनी सन्यास घेतला होता आणि सन्यास घेतल्यानंतर विधी, कर्मकांड करता येत नाही. त्यांनी मात्र सन्यास घेतल्यानंतरही ते केले आणि त्यामुळेच समाजाने त्यांना दूर केले, असे प्रतिपादन प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले.