नागपूर : शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात एका तरुणासह दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना सदर आणि जरीपटक्यातउघडकीस आल्यात. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील परसोडा येथील निकेत भिकुसिंग जाधव (२८) हा दुचाकीने कोराडी मंदिर येथून दर्शन घेऊन नागपूरकडे परत येत होता. शनिवारला मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याची दुचाकी सदर परिसरातील एलआयसी चौक येथे घसरली व त्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी त्याला उपचारार्थ मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
हेही वाचा : गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका – वडेट्टीवार
दुसऱ्या घटनेत, एका कंपनीमध्ये डिलेव्हरी बॉयचे काम करणाऱ्या हुजेफा जैदी ईब्नेहसन जैदी (२४) रा. नई वस्ती, आजादनगर टेकानाका याच्या दुचाकीला टिप्परने धडक देत जखमी केले. उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी ट्रक चालकाविरूध्द गुन्ह्याची नोंद केली आहे. तो १८ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजता दुचाकीने जरीपटका परिसरातील खोब्रागडे चौक ते मानकापूर रिंग रोड पुल मार्टिन नगर येथून आॅफिसचे पार्सल घेऊन जात होता. याचवेळी टिप्पर चालकाने हुजेफा जैदीच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत हुजेफा जैदीचा मृत्यू झाला.