नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडवणीस यांच्याच गृहजिल्ह्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही का याची शंका येणाऱ्या घटनांची मालिका सुरू आहे. शहरातल्या चार ठिकाणी भर दिवसा तोतया पोलीसांनी ज्येष्ठ नागरिक, महिलांना टार्गेट करत अवघ्या काही तासांत दिवसाढवळ्या तब्बल २० तोळे सोन्याचे दागीने आणि ७ लाखांची रोख रक्कम लुटल्याने गस्तीचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंगवर गंभीर प्रश्नचिन्ह लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहरातल्या चार पोलीस हद्दीत हा धूमाकूळ घालत लूटमार करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने महिला आणि ज्येष्ठांना धडकी भरली आहे.
जरिपटकात ठगबाज महिलेने ज्येष्ठ महिलेच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेत निराधार योजनेअंतर्गत दरमहा ७,००० रुपये देण्याचे आमिष दाखवत तिचे दागिने लुटले. ही घटना इंदोरा चौकातील आयटीआय मैदानासमोरील गुरु अर्जुनदेव दुकानाजवळ घडली. सुमन श्यामराव टेभुर्णे (८०), कामठी मार्ग असे लुटल्या गेलेल्या निराधार महिलेचे नाव आहे. त्याची पोलीस डायरीवर नोंद सुरू असतानाच जुगलकिशोर खोदुराम शाहू (६७) यांना लूटले गेले.
शाहू हे दुचाकी पार्क करताना अधिकारी असल्याचे सांगत दोन तोतया पोलिसांनी त्यांच्याकडील ५ लाख रोख आणि १० तोळ्यांची सोनसाखळी पळवली. लोखंडी जाळीचे दुकान चालवणारे शाहू हे दुपारी कल्व्हर्ट, पिलर नंबर ११८/११९ जवळ दुचाकी लावत होते. अंदाजे ४५ वयोगटातील दोन तरुणांनी पोलिस अधिकारी असल्याचे सांगून आधी शाहू यांच्याकडे आधार कार्ड मागितले. दुसऱ्याने गळ्यातली सोनसाखळी रुमालात बांधून ठेवा असे सांगत चोरीची भिती दाखववली. दुकानात परतल्यानंतर शाहू यांनी रुमाल उघडला असता त्यांना रुमालात चार दगड सापडले. त्यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंद करत सीसीटीव्ही तपासणी सुरू केली.
तहसील परिसरात इतवारी रोडवरील अमरकर ज्वेलर्ससमोर ममता धाडियाल (५५) यांना दागीने चोरीची भिती दाखवत एकाने पोलीस असल्याचे सांगत दागिने पर्समध्ये काढून ठेवण्यास सांगितले. त्यावर विश्वास बसल्याने ममता दागीने पर्समध्ये ठेवत असताना त्याने ममता यांचे लक्ष विचलित करत ३ लाख ७० हजारांचे दागिने चोरले. धंतोली परिसरातील लग्न समारंभातून येणारे मध्य प्रदेशातील शेतकरी ओमप्रकाश जयस्वाल (६८) यांना तिघांनी पोलिस अधिकारी असल्याचे भासवून सोन्याची चेन काढून रुमालात बांधून ठेवण्यास सांगत दागिने लुटले. हुडकेश्वर परिसरातही पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तिघांनी निवृत्त शिक्षिका उषा झाडे (६५) २ लाखांचे सोन्याचे दागिने लुटले. अवघ्या काही तासांत एका पाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे गस्तीचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंगवर संताप व्यक्त होत आहे.
