नागपूर : आम्ही पती-पत्नी दिव्यांग आहोत. आमच्याकडून कामधंदा होत नाही. दोन मुली असून आम्हाला सांभाळण्यासाठी मोठी मुलगी आरतीने स्वतः लग्न न करता लहान बहिणीचे लग्न लावून दिले. आरतीच्या सहाऱ्याने आम्ही जगत होतो, परंतु, आमचं नशिब एवढं फुटकं की आमचा एकमेव आधारसुद्धा दैवाने हिरावल्या गेला. आता आम्ही कुणाच्या भरोशावर जगावं, हाच प्रश्न मनी येऊन जीव नकोसा होत असल्याची भावनिक साद निळकंठ सहारे यांनी घातली. ते सोलार कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बसून धाय मोकलून रडत आपले दुःख व्यक्त करीत होते.

निळकंठ सहारे (७०) आणि वनिता (६८) हे दोघे कामठी मासोद येथे राहतात. निळकंठ यांना लकवाग्रस्त असल्याने नीट उभे राहता येत नाही तर पत्नी वनिता या बालपणापासून मुक्या आहेत. त्यांना आरती (२७) आणि भारती (२४) दोन मुली. आईवडिलांकडून कामधंदा होत नसल्याने आरतीने बालपणापासूनच घरातील कर्तेपणा घेतला. रोजंदारीला जाऊन बहिण आरतीचे शिक्षण केले. लग्नाचे वय झाल्याने आरतीला स्थळ शोधणे सुरु होते. मात्र, लग्नानंतर आईवडिलांचा सांभाळ कोण करेल? असा प्रश्न तिच्या मनात भेडसावत होता. त्यामुळे तिने स्वतः अविवाहित राहून लहान बहिण भारतीच्या लग्नाची तयारी केली. पै-पै जोडून बहिणीचे लग्न लावून दिले. ती बाजारगावातील सोलार एक्सप्लोसीव्ह कंपनीत ९ हजार रुपये वेतनावर काम करीत होती.

हेही वाचा : ब्लॉग : अमरावतीतच गाडगेबाबांच्या विचारांना तिलांजली, मुख्यमंत्र्यांनाही पडला विसर!

आरतीच्या कमाईवर आई-वडिलांचा खर्च भागत होता. घरात सर्व काही सुरळीत सुरु होते. नुकताच दिवाळीत आरतीने बहिणीला व तिच्या मुलाला दिवाळीला घरी आणले. आईवडिल व बहिणीला कपडे घेऊन दिवाळी साजरी केली. तिच्या आईवडिलांनाही मुलगा नसल्याचे अजिबात दुःख नव्हते. सुखी सुरु असलेल्या संसारात विघ्न आले.

हेही वाचा : अकोल्यात नवा पाहुणा, प्रथमच पांढऱ्या शेपटीची टिटवी व ‘टेम्मिंकचा पाणलावा’चे दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी सकाळी सहा वाजता आरती कंपनीत कामावर गेली आणि नऊ वाजता आरती मृत पावल्याचा निरोप आला. त्यामुळे निळकंठ आणि वनिता यांचे अवसान गळाले. त्यांनी लगेच नातेवाईकांच्या मदतीने सोलार कंपनी गाठली. मात्र, त्यांना मुलीचा मृतदेह पाहू देण्यास कंपनीच्या व्यवस्थापनाकडून नकार देण्यात येत होता. त्यामुळे कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रडत आपली व्यथा मांडत होते.