यवतमाळ : जांभूळ तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाच्या हातून झाडाची फांदी तुटली आणि त्याच फांदीचा तुकडा त्याच्या डोळ्याच्या खोबणीत शिरला. त्याला गंभीर दुखापत झाली.परंतु, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभागाने प्रसंगावधान राखत शस्त्रक्रिया करून तो तुकडा काढला. या घटनेने तरुणाच्या डोळ्याची अश्रूनळी तुटली पण डोळा थोडक्यात बचावला, असे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

राहुल शिंदे (२१) रा.नेताजीनगर, आर्णी असे जखमीचे नाव आहे. तो १० जूनला महाळुंगी येथील विकी धोत्रे यांच्या शेतातील जांभूळ तोडण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. जांभूळ तोडत असताना अचानक झाडाची फांदी तुटली आणि फांदीचा तुकडा राहुलच्या डाव्या डोळ्याच्या खोबणीत शिरला. प्रचंड वेदना सहन करीत जखमी अवस्थेत तो त्याच दिवशी यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोहोचला. घटनेचे गांभीर्य बघता नेत्र विभागातील डॉक्टरांनी त्याच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरु केली. रुग्णालयाचे नेत्र व बुबुळ रोगतज्ज्ञ डॉ. निखिल चांदुरे यांनी अत्यंत शिताफीने यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या डोळ्यात रुतलेला फांदीचा तुकडा काढला. या शस्त्रक्रियेसाठी सहाय्यक म्हणून डॉ.सादिक बेनीवाले यांच्यासह शिकावू डॉक्टर व परिचारिकांनी सहकार्य केले. पाच सेंमी फांदीचा तुकडा त्याच्या डोळ्याच्या खोबणीत शिरल्याने तरुणास प्रचंड वेदना होत होत्या. शस्त्रक्रियेस उशीर झाला असता तर डोळ्यात संसर्ग (फंगस) होवून अंधत्व येण्याचा धोका होता. तरीही, त्याची डोळ्यातील अश्रुनलिका तुटली. परंतु, वेळीच ही शस्त्रक्रिया करता आल्याने त्याची दृष्टी आता ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अशा प्रकारचे रुग्ण फार दुर्मिळ येतात त्यांच्यावर खासगी उपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु, शासकीय रुग्णालयातील नेत्रविभागाच्या डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत ही शस्त्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर, नेत्ररोग विभागप्रमुख डॉ.स्नेहल बोंडे – चौरसिया यांचे मार्गदर्शन लाभले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुविधा

शासकीय रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्रदान केल्यानंतर डोळ्यांचे प्रत्यारोपण केले जाते. बुबुळावर आलेला (टेरेजियम) पडदा काढल्या जातो. नासूर शस्त्रक्रिया, डोळ्यांचे क्ष – किरण तपासणी, लेझर तंत्रज्ञानाने लेन्सवरील पडदा काढल्या जातो. बुबुळाची तपासणी व अल्सरवर उपचार, रेटीना तपासणी व निदान, डोळ्यांची नियमित तपासणी, चष्म्याचा नंबर, पापणीवरील (कॅलेजियन) गाठ काढून टाकणे तसेच काचबिंदू उपचार आणि निदान यासारख्या सुविधा वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना अगदी मोफत दिल्या जातात. शासनाच्या आरोग्यदायी योजनेतून महत्वाच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. राहुल शिंदे या रूग्णावर वेळीच उपचार झाले नसते तर त्याचा डोळा अधू झाला असता. सामान्यपणे अशा गंभीर रुग्णांना मोठ्या इस्पितळात रेफर केले जाते. परंतु,नेत्र विभागाने जोखीम पत्करत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. माहितीचा अभाव असल्याने बरेच रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत नाही. मात्र डोळ्यांच्या तपासणीपासून ते जटील अशा शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात पार पडतात. याशिवाय गुंतागुंतीच्या रोग निदानासाठी येथे अत्याधुनिक सुविधा आहे. त्यामुळे रुग्णांनी येथील सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेत्ररोग विभागप्रमुख डॉ.स्नेहल बोंडे -चौरसिया यांनी केले.