नागपूर : एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडणारे प्रियकर-प्रेयसी कुटुंबीयांच्या विरोधासह अन्य अडचणींचा सामना करीत प्रेमविवाह करतात. सात जन्म एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतात. मात्र, दोघांचे पती-पत्नीत रुपांतर झाल्यानंतर संसारात शेकडो अडचणी आल्याने थेट घटस्फोटाकडे कल वाढत चालला आहे. गेल्या पाच वर्षात तब्बल ३ हजार ६० प्रेमविवाह करणाऱ्यांनी भरोसा सेलमध्ये मदतीसाठी धाव घेतली आहे.

फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरून एकमेकांच्या प्रेमात पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच वर्गमित्र किंवा मैत्रीतून युवक-युवती एकमेकांच्या प्रेमात पडल्याचेही प्रमाण वाढत आहे. दोघेही सुरुवातीला प्रेमात बुडाल्यानंतर एकमेकांवर जीव ओवाळून टाकण्याची भाषा करतात. काही दिवसांच्याच प्रेमसंबंधात दोघांचाही एकमेकांवर विश्वास बसून थेट प्रेम विवाहापर्यंत मजल जाते. प्रेमविवाहास युवकाच्या कुटुंबियांमध्ये फारसा विरोध दिसत नाही. परंतु, युवतीच्या कुटुंबियांतून प्रेमविवाहास नेहमी विरोध असतो. समाजात असलेली प्रतिष्ठा आणि नातेवाईकांमध्ये होणारी बदनामी याची भीती असते. परंतु, प्रेमविवाहास सर्वाधिक उत्सूकता तरुणीकडूनच दाखवल्या जाते.

हेही वाचा : प्रजासत्ताक दिनाला शिवरायांच्या राज्यकारभारावर आधारित चित्ररथ, यवतमाळच्या पाटणबोरीत साकारली शिल्पकृती

अनेक प्रकरणांमध्ये प्रियकर प्रेमविवाहास टाळाटाळ करतो तर युवती थेट घरातून पळून जाऊन लग्न करण्याची तयारी दर्शवते. भविष्यात सुखी संसाराची स्वप्ने रंगविल्या जातात. प्रत्येक अडचणींवर मात करून संसार यशस्वी करण्याचा दोघांचाही मानस असतो. त्यामुळे भविष्याचा कोणताही विचार न करता कुटुंबियांचा विरोध पत्करून अनेक प्रेमविवाह पार पडतात. दोघांचा वेगळा संसार सुरु होता. दोघांवरही पती-पत्नी म्हणून जबाबदारी येते. दोघांच्याही भूमिका बदलतात आणि संसारात खटके उडायला सुरुवात होते. ‘तुझे पूर्वीसारखे प्रेम राहिले नाही किंवा तू मला वेळ देत नाही,’ अशी तक्रार पत्नीची असते तर काम शोधण्यापासून तर घराचे भाडे देण्यापर्यंतचा विचार पती करीत असतो. याच कारणामुळे घरात पती-पत्नीत वाद वाढायला लागतात. त्यामुळे संसार तुटण्याच्या काठावर येतो. नागपुरात असे शेकडो प्रेमविवाह सध्या मोडकळीस आलेले दिसतात. गेल्या पाच वर्षांत ३ हजार ६० जणांनी प्रेमविवाह केल्यानंतर वाद झाल्यानंतर भरोसा सेलकडे धाव घेतली आहे.

हेही वाचा : नागपूर : बलात्काराच्या आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, हुडकेश्वर पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत

तरुणींना सर्वाधिक अडचणी

कुटुंबियांचा विरोध पत्करून प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्यानंतर तरुणीचे माहेर तुटते. माहेरकडील कुणीही तिला साथ देत नाही किंवा थेट संबंध तोडतात. प्रेमविवाहानंतर दोघांतील वाद मिटवायला कुणी नातेवाईकही तयार नसतात. एकाकी पडलेल्या तरुणीची बाजू ऐकुनही घ्यायला कुणी तयार नसते. कठिण परिस्थितीत तरुणींना जीवन कंठावे लागते.

हेही वाचा : नागपुरात दोन गुन्हेगार जेरबंद; दोन पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

“प्रेमविवाह केल्यानंतर नव्या संसारात खटके उडण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रेमविवाहानंतर अगदी काही महिन्यांतच दोघांत वाद झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. मात्र, भरोसा सेलमध्ये तक्रार आल्यानंतर दोघांनाही बोलवून संसार आणि वैवाहिक आयुष्याबाबत समूपदेशन केल्या जाते. अनेकांचे संसार नव्याने थाटण्यात भरोसा सेलला यश आले आहे.” – सीमा सूर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरोसा सेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेमविवाहानंतरच्या तक्रारींची आकडेवारी

वर्ष – तक्रारी
२०१९ – ३८६
२०२० – ४५८
२०२१ – ६४१
२०२२ – ७८९
२०२३ – ७८६