नागपूर : नंदनवन पोलिसांनी दोन गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि ७ काडतूस जप्त केले. नौशाद अंसारी (२०), मो. शाकीब (२२) दोन्ही रा. हसनबाग अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रविवारी रात्री नंदनवन पोलिसांचे पथक गस्त घालत असताना दोन युवकांकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. पथकाने हसनबागच्या गल्ली नंबर ५ मध्ये घेराव करून नौशाद आणि शाकीब या दोन संशयितांना ताब्यात घेतले. हे दोघेही पप्पू पटेल या गुन्हेगाराकडे काम करायचे. दोघेही ट्रॅव्हल्सच्या कामावर होते. पप्पूवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. तीन महिन्यांपूर्वी दहशतवादी विरोधी पथकाने त्याच्या घरी धाड मारून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. तेव्हापासून त्याचे ट्रॅव्हल्सचे काम कमी झाले. त्यामुळे दोघांनीही काम बंद केले होते.
हेही वाचा : नागपूर जिल्ह्यात नवमतदार वाढले, कौल ठरणार निर्णायक
गेल्या काही दिवसांपासून पप्पू घरून फरार आहे. पोलिसांनी सखोल विचारपूस केली असता, दोन पिस्तूल पप्पू पटेल याच्याकडून घेऊन घरी ठेवल्याचे नौशादने सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता लोखंडी कपाटात पिस्तुलासह चार जिवंत काडतूस तर शाकीब याच्याकडे पिस्तूलसह तीन जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी एक लाख ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगल्याने तसेच त्यांनी सह पोलीस आयुक्त यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुद्ध विविध कलामान्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकरी यांच्या मार्गदर्शनात अधिकारी प्रवीण भगत, प्रवीण मरापे, राहुल खळतकर आणि अनिकेत वैद्य यांनी केली.