scorecardresearch

नागपूर : राज्य कामगार विमा रुग्णालयात ‘राडा’

दोन तास चाललेल्या या प्रकारामुळे येथील आकस्मिक विभागातील रुग्णसेवा ठप्प पडली होती.

hispital agigation in nagur
राज्य कामगार विमा रुग्णालयात ‘राडा’

नागपूर : सोमवारपेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात मंगळवारी दुपारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावावर आंदोलक वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्या कार्यालयात शिरले. येथे या महिला अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेल्यावर आंदोलकांना रोखणाऱ्या कर्मचारी व पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दोन तास चाललेल्या या प्रकारामुळे येथील आकस्मिक विभागातील रुग्णसेवा ठप्प पडली होती.

राज्य कामगार विमा रुग्णालयात कंत्राटी कामगार असल्याचे सांगत दुपारी १२ वाजताच्या सुमारास २५ ते ३० जण वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाजवळ जमले. येथे आंदोलकांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुरक्षा रक्षकाला धक्का देऊन थेट कार्यालयात प्रवेश केला. येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्याशी गैरवर्तन केले गेले. त्यानंतरही डॉ. देशमुख यांनी आंदोलकांना तुम्ही कंत्राटी कर्मचारी असल्यास तुमच्या वेतनाशी प्रशासनाचा थेट संबंध येत नाही. त्यानंतरही तुमच्या काही तक्रारी असल्यास देण्याचा सल्ला दिला. आंदोलक डॉ. देशमुख यांचे काहीही ऐकायला तयार नव्हते. त्यातच काहींनी थेट डॉ. देशमुख यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, रुग्णालयातील काही लिपिक डॉ. देशमुख यांना वाचवण्यासाठी आडवे आले. त्यानंतर आंदोलकांनी या कर्मचाऱ्यांनाच धक्काबुक्की केली.

हेही वाचा >>> नागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास

प्रकरणाचे गांभीर्य बघत तातडीने पोलिसांना रुग्णालयात पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही आंदोलकांना वैद्यकीय अधीक्षिकेच्या कार्यालय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतप्त आंदोलकांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त पोलिसांची कुवक मागवली. त्यानंतर बळजबरीने आंदोलकांना रुग्णालयाच्या इमारतीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सुमारे १३ जणांना ताब्यात घेऊन सक्करदरा पोलीस ठाणे गाठले. येथे ताब्यात घेतलेल्यांची नावे राज्य कामगार विमा रुग्णालय प्रशासनाने तपासली असता त्यापैकी केवळ दोनच कंत्राटी कर्मचारी विमा रुग्णालयात सेवेवर असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या नावावर येथे राडा करण्यामागे इतरही काही कारण होते काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा >>> नागपूर : धवनकर प्रकरणात निवृत्त न्यायमूर्तींची चौकशी समिती गठित

एक आंदोलक भोवळ येऊन पडला

आंदोलनादरम्यान एक आंदोलक भोवळ येऊन खाली पडला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टिकोनातून तातडीने त्याला रुग्णालयात घेतले. रुग्णाच्या विविध तपासणी करून प्रथमोपचार केले व मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले.

रुग्ण अडकून पडले

आंदोलनामुळे राज्य कामगार विमा रुग्णालयातील आकस्मिक अपघात विभागातील रुग्णसेवा ठप्प पडली होती. आंदोलकांच्या गोंधळामुळे रुग्णांना आतही जाता येत नव्हते. त्यामुळे सुमारे दोन तास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.

काही आंदोलक कार्यालयात माझ्या अंगावर धावले. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यावरही ते कुणाचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणाची पोलिसांना तक्रार दिली आहे.

– डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 09:23 IST