वर्धा : एखाद्या विभागाचा विकास साधायचा असेल तर विविध उपक्रम तिथे राबविल्या जातात. मागास म्हणून गडचिरोली जिल्ह्यावर बसलेला शिक्का पुसून काढण्याचा चंग शासनाने बांधला आहे. त्या अनुषंगाने नोव्हेंबर २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन,इंकुबेशन अँड ट्रेनिंग सेंटरचे उदघाटन केले होते. राज्य शासन, टाटा टेक्नॉलॉजी व गोंडवाना विद्यापीठाचा हा संयुक्त उपक्रम आहे. विद्यार्थी व युवकांना उद्योगपूरक प्रशिक्षण, संशोधन व उद्योजकता वाढण्यास सुविधा, कौशल्य विकास हे हेतू.  रोबोटिक्स, आधुनिक यंत्र, इलेक्ट्रिक वाहने, ऑटोमोबाईल पार्टसचे उत्पादन अश्या पैलूने प्रशिक्षण. वार्षिक ५ हजार विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. हे केंद्र गडचिरोली जिल्ह्याचे स्वरूप पालटेल असा दावा तज्ञ करतात.

आता असेच केंद्र वर्ध्यात उभारण्याच्या हालचाली सूरू झाल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील युवकांना रोजगारभिमुख प्रशिक्षण मिळावे यासाठी वर्धा येथे देखील या केंद्राची स्थापना करण्यात यावी, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना केली आहे. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी म्हटले आहे की, नुकतीच आपण जिल्ह्याला भेट दिली. या भेटीत आपण टाटा  टेक्नॉलॉजीचे सेंटर फॉर इनवेनटेशन, इनोवेशन,इनक्युबिशन अॅन्ड ट्रेनिंग केंद्र वर्धेत स्थापन करण्यात बाबत निर्देश दिले आहे. 

प्रगत कौशल्यविकास व रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात अद्यापही प्रगतीस वाव आहे. राज्य शासनाच्या उदयोगभिमुख तांत्रिक शिक्षण व संशोधवर्धक धोरणाशी सुसंगत राहून वर्धा येथे सीआयआयआयटी केंद्राची स्थापना होणे अत्यावश्यक आहे.या केंद्रामुळे उदयोग रोबोटिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता-मशिन लर्गिंग, इलेक्ट्रीक वाहन तंत्रज्ञान व स्वयंचलन यासारख्या बाबीस प्रोत्साहन मिळणार आहे.शैक्षणिक संस्था व उदयोग यांच्यातील समन्वय दृढ होऊन युवकांची रोजगार क्षमता वाढविणे, विदर्भात नव्या उदयोग व स्टार्टअपना आकर्षित करून संतुलित प्रदेशिक विकासाला चालना मिळणार आहे.वर्धा तसेच लगतच्या जिल्ह्यातील हजारों विधाथ्र्यांना गुणवत्तापुर्ण तांत्रिक शिक्षण व करियर संधी प्राप्त होऊ शकते.

टाटा टेक्नाॅलॉजीने राज्यात अनेक ठिकाणी या प्रकारची केंद्रे स्थापन केली आहे.या उपक्रमासाठी वर्धा जिल्हा सर्वार्थाने योग्य असून जिल्हा प्रशासन आवश्यक पायाभूत सुविधा तांत्रिक शिक्षण संस्थांशी समन्वय व प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळे आपण या संदर्भात पुढाकार घेऊन वर्ध जिल्ह्याचा समावेश प्रस्तावित सीआयआयआयटी विस्तार योजनेत करावा.तसेच आवश्यक सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून टाटा टेक्नाॅलॉजी सोबत चर्चेसाठी संबंधित विभागला निर्देश द्यावे, अशी विनंती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. आपल्या या सकारात्मक निर्णयामुळे जिल्ह्यातील युवकांना नवीन संधी प्राप्त होईत तसेच राज्याचे भविष्यभिमुख कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यास चालना मिळेल, असे ही पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी म्हटले आहे.