अकोला : नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रचंड हलगर्जीपणा अकोल्यातील हॉटेल चालक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी बाहेरून आणलेल्या पोह्यात चक्क पालीचे मुंडके आढळल्याची किळसवाणी घटना घडली. त्यामुळे रुग्णाची प्रकृती देखील बिघडली होती. या प्रकरणात संबंधित रेस्टॉरंट चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
अद्यापपर्यंत अन्न व औषध प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. या गंभीर प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३२ येथे शेख सोहेल या रुग्णावर उपचार केले जात आहेत. या रुग्णाच्या नाश्त्यासाठी सकाळी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोरील ‘अग्रवाल’ नावाच्या रेस्टॉरंटमधून कांदा पोहे एक प्लेट आणले. पोहे खाल्ल्यानंतर रुग्णाला मळमळ आणि उलटी झाली.
पोह्यामध्ये पाहिले असता त्यामध्ये पालीचे मुंडके आढळून आले. त्यामुळे रुग्णासह नातेवाईकांना मोठा धक्काच बसला. संबंधित रेस्टॉरंट चालक प्रचंड हलगर्जीपणा करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवला. मात्र, अद्यापपर्यंत रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, आपल्याकडून पोहे खरेदी केल्याचा आरोप रेस्टॉरंट चालकाने फेटाळला आहे.
उघड्यावरील व बाहेरचे अन्नपदार्थ खाणे धोकादायकच
उघड्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये जीवाणू आणि दूषित घटक असण्याची शक्यता असते. अकोल्यातील एका रेस्टॉरंटच्या नाश्त्यात तर चक्क पालीचे मुंडके आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हलगर्जीपणामुळे दूषित अन्नप्राशन केल्यास विषबाधा (फूड पॉयझनिंग), जुलाब, उलट्या आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. या पदार्थांचे सेवन केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारख्या दीर्घकालीन आरोग्याच्या समस्यांचा धोकाही वाढतो.
खराब, अस्वच्छ परिसर आणि अयोग्य हाताळणीमुळे अन्न दूषित होते. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. उघड्यावरील पदार्थांमध्ये एस्चेरिचिया कोलाई, साल्मोनेला, कॅम्पिलोबॅक्टर यांसारखे जीवाणू असू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होते आणि पोटाचे विकार उद्भवतात. विक्रेत्यांच्या हाताळणीत, वापरल्या जाणाऱ्या भांड्यांमध्ये आणि परिसरामध्ये स्वच्छतेचा अभाव असतो. यामुळे अन्न दूषित होते. रस्त्याच्या कडेला असल्याने उघड्यावरील पदार्थांवर धूळ आणि प्रदूषण सहजपणे जमा होते, ज्यामुळे ते खाण्यास धोकादायक ठरतात, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.