यवतमाळ : येथील वैद्यकीय महाविद्यालयच विविध कारणांनी आजारी पडल्याचे चित्र आहे. विविध आजारांवर उपचरासाठी येणाऱ्या रुग्णांना चाचण्यांचे निदान होत नसल्याने त्यांची ओरड सुरू आहे. येथे सोनोग्राफीसाठी पूर्वी एक ते दोन महिन्यांची तारीख दिली जात होती. आता एमआरआय व सीटी स्कॅनसाठी एक महिन्याची तारीख दिली जात आहे. महिनाभर वेटींगवर रहावे लागत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. औषधी मिळत नसल्याची ओरड आता बारमाही झाली आहे. व्हायरलसह न्युमोनिया आजारांचे रुग्ण उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात येत आहेत. जिल्ह्यात किडनी आजाराचे रुग्ण वाढतीवर आहे. विविध आजाराने गंभीर असलेल्या रुग्णांची तपासणी केल्यावर त्यांना एमआरआय, सीटीस्कॅन, सोनोग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. चिठ्ठी घेऊन गेल्यावर तिथे एक महिन्याची तारीख देऊन नंतर येण्याचे सांगितले जाते. या मनमानी कारभाराने गरीब व गंभीर आजारी रुग्णांचे हाल होत आहे. किडनी स्टोनच्या वेदनेने त्रस्त असलेल्या एका रुग्णाच्या संदर्भात हा प्रकार घडला. हातात पैसा नसताना खाजगी रुग्णालयाची वाट त्याला धरावी लागली.

हेही वाचा – चंद्रपुरातील पुरातन मंदिर, किल्ल्यांचे रुपडे पालटणार; ५८ कोटींचा निधी प्रस्तावित

वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्य बजावणार्‍या बहुतांश डॉक्टरांचा खाजगी व्यवसाय आहे. येथे काही अडचण आल्यास रुग्ण त्यांच्याच खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. विभागप्रमुख नियमित वार्डात जाऊन राऊंड घेत नाहीत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याची ओरड रुग्णांकडून केली जात आहे. या रुग्णालयाला कुणी वाली आहे की नाही, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी; आचारसंहिता लागू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यागत मंडळाचे भिजत घोंगडे

लोकप्रतिनिधींचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनावर कोणताही वचक नाही. सरकार स्थापन होऊन दोन वर्षे होत आली, मात्र अद्याप वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यागत मंडळाची स्थापना झाली नाही. ही फाईल पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे पडून आहे. सरकारचे त्रांगडे असल्याने समितीत कोणाला अध्यक्ष करायचे, यासाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाविद्यालयात कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे कारभार दिवसेंदिवस सैरभैर होत चालला आहे.