हैदराबाद प्रयोगशाळेच्या अहवालाचा निष्कर्ष
पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या नागपूर प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारीतील देवलापारमध्ये नववर्षांच्या पहिल्याच दिवशी मरण पावलेला वाघ मध्य प्रदेशातील कर्माझरी येथील असल्याचे शिक्कामोर्तब भारतीय वन्यजीव संस्थेने केले होते. तब्बल चार महिन्यांनी हैदराबादच्या सीसीएमबी प्रयोगशाळेचा अहवाल नागपूर प्रादेशिक वनखात्याला मिळाला. या अहवालात मरण पावलेल्या वाघाची गुणसूत्रे ताडोबा-चंद्रपूरमधील वाघांशी जुळती आहेत. केंद्राच्या अखत्यारीतील या दोन्ही संस्थांच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या सुमारे ६०० किलोमीटरचे हे सर्वाधिक मोठे स्थलांतर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देवलापार वनपरिक्षेत्राअंतर्गत दक्षिण जुनेवानी बीट क्र. ४९२ मध्ये एक जानेवारी २०१६ रोजी संशयास्पद स्थितीत वाघाचा मृत्यू झाला. चार दिवसानंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणात वाघाशेजारीच चितळ आणि रानडुकराचाही मृतदेह आढळला होता. त्यामुळे हे मृत्यू नैसर्गिक नाही, तर विषबाधेने झाले असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी वाघाच्या स्नायूचे नमुने हैदराबादच्या सीसीएमबी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. हा वाघ महाराष्ट्रातील की मध्य प्रदेशातील, असा वाद त्यावेळी उद्भवल्यानंतर भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्ल्यूआयआय) कॅमेरा ट्रॅपच्या अभ्यासातून हा वाघ मध्य प्रदेशातील असल्याचे शिक्कामोर्तब केले. मध्य प्रदेशातील अलीकडेच संशयास्पद स्थितीत मरण पावलेल्या ‘वाघीणनाला’ या वाघिणीचा तो चाडेचार वर्षांंचा बछडा होता. वाघिणीपासून वेगळे झाल्यानंतर तो स्वत:चे अधिकारक्षेत्र शोधण्यासाठी भटकत येथपर्यंत आला असावा, असा अंदाजही या संस्थेच्या संशोधक अनन्दिता चटर्जी यांनी व्यक्त केला. हैदराबादच्या सीसीएमबी प्रयोगशाळेने वाघाच्या स्नायुंचे नमुने तपासल्यानंतर अहवाल नागपूर वनखात्याकडे नुकताच सुपूर्द केला. या अहवालानुसार मृत वाघाचे डीएनए ताडोबा-चंद्रपूर लँडस्केपमधील वाघांशी जुळल्यामुळे या वाघाने सुमारे ६०० किलोमीटरचे अंतर पार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाघ एकच -चटर्जी
हा अहवाल आल्यानंतर अनन्दिता चटर्जी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी, मध्य प्रदेशातील कर्माझरी येथील कॅमेरा ट्रॅपमधील वाघाचे छायाचित्र आणि देवलापारमध्ये मरण पावलेला वाघ एकच होता, यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. मात्र, डीएनए ताडोबा-चंद्रपूर लँडस्केपमधील वाघाशी जुळत असतील तर त्यासंदर्भात आपण काही सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.