वाघांचे अनुवांशिक परिवर्तन टिकविण्याचा प्रश्न

नागपूर : भारतीय वन्यजीव संस्थेने वाघासह इतरही वन्यप्राण्यांच्या संचारमार्गाची ओळख पटवली असतानाच काळविटांच्या अभयारण्यातील वाघाच्या प्रवेशाने नवा संचारमार्ग समोर आला आहे. कारंजासोहोळ अभयारण्यासह अकोला एमआयडीसी परिसर तसेच खामगावातील वाघाच्या उपस्थितीने वाघांच्या नव्या संचारमार्गांवर शिक्कामोर्तब झाले आहे. वाघांचे अनुवंशिक परिवर्तन टिकवून ठेवण्यात ‘लाईफलाईन’ म्हणून काम करणाऱ्या या संचारमार्गांच्या स्वतंत्र व्यवस्थापनाची गरज यानिमित्ताने समोर आली आहे.

भारतातील वाघांच्या संरक्षण व संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वाघांचे अनेक संचारमार्ग त्यांनी ओळखले आहेत. ज्यामुळे वाघांसह इतरही वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनखात्याला उपाययोजना करता आल्या आहेत. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या हालचाली नसल्याने काही संचारमार्ग ओळखता आले नाहीत आणि आता ते वाघाच्या स्थलांतरणामुळे नव्याने समोर आले आहेत. राज्यातील अधिकाधिक संचारमार्ग हे प्रादेशिक विभागात आहेत. यातील अनेक संचारमार्गांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती असून काही वनजमिनीतून गेले आहेत. अनेक संचारमार्ग धोक्यात असून त्याचा वाघांच्या स्थलांतरणावर परिणाम होऊ शकतो. हे संवेदनशील संचारमार्ग ओळखून त्यांच्या स्वतंत्र व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे. वाघांचे अनुवंशिक परिवर्तन टिकवून ठेवण्यासाठी हे संचारमार्ग म्हणजे जीवनरेषा आहेत. ते संपले तर एकाच क्षेत्रात प्रजनन होऊन अनुवंशिक परिवर्तनात बाधा येईल. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन किंवा स्वतंत्र कृती आराखड्याची गरज व्यक्त होत आहे. जंगलाच्या दिशेने येणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढत असून संचारमार्ग हा या प्रकल्पातला पहिला बळी ठरतो. त्याचे स्वतंत्र व्यवस्थापन असल्यास हा धोका टळू शकतो. राज्याच्या वनखात्याने  वन्यजीव कृती आराखड्याच्या रूपाने चांगले पाऊल उचलले आहे.  या नव्याने समोर आलेल्या संचारमार्गांचे स्वतंत्र व्यवस्थापन झाल्यास मानव-वन्यजीव संघर्षाला आळा घालण्यास मदत होईल, असा विश्वास वन्यजीव अभ्यासकांना आहे.

वन्यप्राण्यांच्या संचारमार्गाच्या संवर्धनासाठी प्रभावी नियोजन केल्यास ते मानवहितासाठी फायद्याचे ठरणार आहे. वन्यप्राण्यांचा संचार लक्षात घेता मानव-वन्यजीव संघर्ष वाढू नये यासाठी स्वतंत्र आराखडा असणे आवश्यक आहे. संचारमार्गांची नव्याने ओळख, प्रभावी वन्यजीव व्यवस्थापन, संचार मार्गातील गावांसाठी लोकहिताच्या योजना आणि जनजागृती यावर भर देणे आवश्यक आहे. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षच कमी होणार नाही तर वनखात्याची प्रतिमा देखील उंचावेल. 

यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने संचारमार्ग अधोरेखित केले आहेत. अकोला, खामगावसह कारंजा सोहोळसारख्या अभयारण्यात वाघाचे येणे ही नव्या संचारमार्गाची नांदी आहे. म्हणूनच भारतीय वन्यजीव संस्थेला त्याचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. जेणेकरून वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने नव्या संचारमार्गाचे व्यवस्थापन करता येईल.

सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव)