विमान इंजिन दुरुस्तीचे खासगी कंपनीचे देशातील पहिले केंद्र नागपुरात

या कंपन्याच्या सीएमडी देखील डॉ. कल्पना सरोज आहेत. संपूर्ण कर्जमुक्त आणि नफ्यातील कंपनी आहे.

नागपूर : विमान आणि हेलिकॉप्टरच्या इंजिनच्या दुरुस्ती व देखभालीसाठी नागपुरात ‘इंजिन हॉस्पिटल एमआरओ’ सुरू होत आहे. त्याची मुहूर्तमेढ रविवारी मिहान-सेझमध्ये रोवण्यात आली. एखादा खासगी कंपनीचे केवळ इंजिनच्या दुरुस्ती केंद्र नागपुरातील हे केंद्र देशातील पहिले ठरणार आहे.

कल्पना सरोज ग्लोबल एव्हीएशन प्रा.लि.(केएसजीए) च्या नागपुरातील प्रस्तावित ‘इंजिन हॉस्पिटल एमआरओ’चे भूमिपूजन रविवारी झाले. यासाठी कल्पना सरोज एव्हिएशनने मिहान-सेझमध्ये १ एकर जमीन घेतली आहे. हे केंद्र मार्च २०२३ पर्यंत सुरू केले जाणार आहे. देशात सध्या ६०० विमानाचे इंजिन देखभाल-दुरुस्तीसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. यामुळे या क्षेत्रात मोठा वाव आहे. या केंद्रात वर्षांला ४० ते ६० इंजिनची देखभाल दुरुस्ती केली जाईल. यासाठी स्थानिक लोकांमधून टेक्निशियन घेतले जातील, असे कॅप्टन विनय बांबोळे म्हणाले.

यासंदर्भात कल्पना सरोज ग्लोबल एव्हीएशन प्रा.लि.च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कल्पना सरोज म्हणाल्या, समाजाचे ऋण फेडण्याची संधी म्हणून आम्ही या प्रकल्पाकडे बघतो. यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि स्थानिकांना लाभ होईल, असा दावा त्यांनी केला.

या केंद्राचा संपूर्ण ढाचा उभा करण्यासाठी सुमारे १९ ते २५ कोटी रुपये लागतील. ही रक्कम कामिनी टय़ुब्स लि.कडून घेण्यात येणार आहे. या कंपन्याच्या सीएमडी देखील डॉ. कल्पना सरोज आहेत. संपूर्ण कर्जमुक्त आणि नफ्यातील कंपनी आहे. कॅप्टन विनय बांबोळे यांनी २०१० पासून या प्रकल्पाचा विचार मांडला होता. प्रारंभी त्यांना नागपुरात एव्हीएशन कॉलेज सुरू करण्याचे ठरवले होते. परंतु नंतर इंजिन दुरुस्तीचे केंद्र सुरू करून टप्प्याटप्प्याने वैमानिक प्रशिक्षण केंद्र, हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची योजना आहे. त्यांनी प्रारंभी ३० एकर जमीन घेण्याचा विचार केला होता. परंतु नंतर सुरुवात १ एकर पासून करण्याचा निर्णय घेतला, असेही त्या म्हणाल्या. विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिहानला कल्पना सरोज एव्हीएशनच्या माध्यमातून मोठे बळ मिळेल. यात रोजगार निर्मिती होऊन स्थानिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India first private aircraft engine repair center in nagpur zws

Next Story
‘तो’ पोपट १५ दिवसांपासून वन कोठडीतच