भंडारा : तुमसर तालुक्यात खंदाड या गावातील रतनलाल वाघमारे याच्या शेतामध्ये काल कुजलेल्या अवस्थेत एका वाघाचा मृतदेह आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. वाघाची शिकार की मृत्यू याबाबत तपास सुरू असताना या शेतकऱ्यानेच वाघाला मारले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
भीतीपोटी त्याने हा सर्व प्रकार लपवून ठेवला असल्याचे आतापर्यंत झालेल्या चौकशीतून पुढे आले असले तरी यातून आणखी काही धागेदोरे मिळतात का याचा तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.
हेही वाचा – एमपीएससीमार्फत राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गातील ८२३ जागांसाठी पदभरती!
तुमसरवरून २८ किलोमीटर अंतरावरील वन परीक्षेत्रालगतच्या धानाच्या शेतीमध्ये सात दिवसांपूर्वी वाघाचा मृत्यू झाला होता. शेतात रानडुकरांचा धुमाकूळ असल्याने वाघमारे याने शेतात विद्युत तारा टाकून ठेवल्या होत्या. रानडुकरासाठी त्याने हा सापळा रचला होता. मात्र या परिसरात वाघाचा संचार असतोच. अनेकदा शेतात वाघाचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी वाघ या शेतशिवारात वावरत असताना वाघमारे यांनी लावलेल्या सापळ्यात तो अडकला आणि तीव्र विद्युत धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रानडुक्कर मेला असावा म्हणून वाघमारे याने जाऊन पाहिले असतात त्यांना तेथे वाघ मेलेल्या अवस्थेत दिसला. मृतावस्थेत वाघाला बघून त्याची घाबरगुंडी उडाली. भीतीपोटी त्याने वाघाचा मृतदेह झुडूप आणि पालापाचोळा याने झाकून ठेवला. मात्र सात दिवसांनंतर मृतदेहाला दुर्गंधी येवू लागली. काल सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पोलीस पाटील कमलेश भारद्वार यांना धानाच्या एका शेतामध्ये झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेला वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली.
शेतकऱ्याकडे विचारणा केली असता, तीन दिवसांपूर्वी या मृत वाघाला झाडाच्या फांद्यांनी झाकून ठेवल्याचे त्याने खोटे सांगितले. मात्र या प्रकरणी शेतकरी रतनलाल वाघमारे यांच्या घरी वन विभागाने शोध घेतला असता विजेचे वायर आणि ते पसरविण्यासाठी काठ्या आढळल्या. यावरून त्या वाघाचा मृत्यू विजेच्या सापळ्यात अडकूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी आणि वन विभागाने व्यक्त केला आहे. या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता त्यानेच वाघाला मारल्याची कबुली दिली.
हेही वाचा – तलाठी भरती : पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याने खळबळ, नाशिकमधून गैरप्रकार करणाऱ्यांना अटक
रानडुकरासाठी लावलेल्या सापळ्यात वाघ अडकून मेल्याचे त्याने कबूल केले आहे. मात्र यात आणखी काही धागेदोरे मिळतात का या दिशेने उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली साकेत शेंडे, सी.जी. रहांगडाले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.