जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटक येतात. ताडोबाचे प्राणी, वनवैभव व जैवविविधता जगप्रसिद्ध आहे. देशातील सर्वाधिक वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहे. त्यामुळे हमखास व्याघ्र दर्शनासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटन केले जाते. याच पर्यटनाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील २४० अपंग बांधवांनी घेतला.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघता यावा, अशी इच्छा विकलांग एकता शक्ती संघटना बल्लारपूर जि. चंद्रपूर येथील अपंग बांधवांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री मुनगंटीवार यांचेकडे व्यक्त केली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत ताडोबा-अंधारीच्या अधिकाऱ्यांना सूचना करीत त्यांना ताडोबा सफर घडवावी असे सांगितले . त्यानुसार २ ते ७ एप्रिल २०२३ पर्यंत टप्याटप्याने चंद्रपूर जिल्ह्यातील अपंग बांधवांनी वन पर्यटनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकांनीही ताडोबा सफारी केली.
हेही वाचा >>>अकोला: भक्तीत तल्लीन भाविकांवर काळ बनून वादळ कोसळले; सभामंडपावर वृक्ष पडून सात जणांचा मृत्यू, २६ जखमी
बल्लारपूर येथील विकलांग एकता शक्ती संघटनेच्या माध्यमातून २४० अपंग बांधवांची आणि त्यांच्या पालकांनी ताडोबा भ्रमंती केली . दिव्यांग बांधवांनी ताडोबातील पशू-पक्षी, विविध वृक्ष, विविध प्राणी, ताडोबातील जैवविविधतेचा मनसोक्त आनंद लुटला. सुधीर मुनगंटीवार व वनविभागाच्या माध्यमातून हे पर्यटन दर्शन घडविण्यात आले.
भाजप महानगर चंद्रपूरचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे व वनाधिकारी यांच्या माध्यमातून ताडोबा व्याघ्र प्रकल्प दाखविण्यात आला. यावेळी अपंग बांधवांनी मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.