नागपूर : प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी समाज माध्यमावर शेअर केलेला नागपूरच्या अतरंगी डॉलीच्या हातच्या चहा पिण्याचा व्हिडिओ सध्या जगभरात गाजत आहे. समाजमाध्यमावर ‘डॉली की टपरी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या डॉलीच्या चहाकडे इतका मोठा उद्योगपती कसा आकर्षित झाला हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे बिल गेट्स आणि डॉलीच्या भेटीच्या ‘इनसाईड स्टोरी’बाबत समाजमाध्यमांवर कमालीची उत्सुकता आहे.

व्हिडिओ निर्मितीत सहभागी असलेल्या सूत्रांनुसार, डॉली आणि बिल गेट्सच्या भेट घडवून आणण्यासाठी मागील एक महिन्यापासून प्रयत्न सुरू होते. फाउंडेशनच्यावतीने एका निर्मिती संस्थेला अशी रील तयार करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार संस्थेने समाजमाध्यमांच्याद्वारे डॉलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. यानंतर नागपूरमधील एका स्थानिक व्यक्तीच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. डॉलीचे सर्व व्यवहार त्याचे मोठे बंधू शैलेश आणि लहान बंधू शशांक सांभाळतो. बिल गेट्सशी विषय संबंधित असल्याने सुरूवातीला याबाबत गुप्तता पाळण्यात आली.

हेही वाचा…अशी भन्नाट ‘सायकल कॉफी’ आजपर्यंत कुणी पाहिली नसेल! Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

डॉलीच्या बंधूना एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे चित्रीकरण असल्याची माहिती दिली गेली. यासाठी त्याला २७ फेब्रुवारीला हैदराबादला यावे लागेल असे सांगण्यात आले. विमानाचा खर्च, तारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाहीही दिली गेली. यावर डॉलीने एकटा येणार नाही, तीन लोकांची व्यवस्था करावी लागेल, अशी अट घातली. निर्मिती संस्थेने यामध्ये असमर्थता दाखविल्यावर डॉलीने चित्रीकरणास स्पष्ट नकार दिला. नागपूरच्या टपरीवर राहून अधिक पैसे कमविता येतात असे डॉलीच्यावतीने सांगितले गेले. यानंतर स्थानिक व्यक्ती आणि निर्मिती संस्थेमध्ये बरीच चर्चा झाली.

बऱ्याच वाटाघाटीनंतर डॉलीसह इतर दोन लोकांची संपूर्ण व्यवस्था करण्यासाठी निर्मिती संस्था तयार झाली. यानंतर २६ फेब्रुवारीला सकाळी विमानाने हैदराबादला नेण्यात आले. सायकांळी चार वाजताच्या सुमारास चित्रीकरणाचा सराव केला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बिल गेट्स यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत चित्रीकरण झाले. केवळ १५ मिनिटाच्या कालावधीत हे चित्रीकरण केले गेले. या क्षणापर्यंत डॉलीला आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला बिल गेट्सबाबत माहिती दिली गेली नाही. परदेशी व्यक्तांनी डॉलीच्या खास शैलीमध्ये चहा पाजायचा आहे, केवळ एवढीच माहिती त्याला दिली गेली. २७ फेब्रुवारीला रात्री डॉली आणि इतर दोन व्यक्ती नागपूरला परत आले. यानंतर डॉलीला बिल गेट्सबाबतची माहिती दिली गेली. २८ फेब्रुवारीला सायंकाळी बिल गेट्स फाउंडेशनद्वारा इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झाल्यावरच डॉलीला बिल गेट्स किती मोठे व्यक्ती आहे याची प्रचिती आली.

हेही वाचा…Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क

डॉलीची निवड का केली गेली?

भारतात इतके सारे चहा विक्रेते असताना बिल गेट्सद्वारा नागपूरच्या डॉलीची निवड का केली गेली हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. निर्मिती संस्थेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल गेट्स फाउंडेशन भारतात नवोन्मेषणाला जगभरात नेऊ इच्छितो. दुसरीकडे चहा हा भारतातील सर्वात आवडते पेय आहे. त्यामुळे् नवोन्मेष आणि चहाची एकत्र सांगड घालण्याचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये डॉलीच्या चहा देण्याच्या अनोख्या आणि अतरंगी शैलीमुळे त्याची निवड केली गेली. येत्या काळात बिल गेट्स फाउंडेशनच्यावतीने असे अनेक नवेनवे प्रयोग होणार असल्याची माहिती आहे.