नागपूर : विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतली. आता कोकणात धुमाकूळ घालणारा पाऊस देखील उसंत घेत आहे. थोडक्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. मात्र, पावसाने आपला मोर्चा आता उत्तरेकडील राज्यांकडे वळवला आहे. खासगी हवामान संस्था स्कायमॅटने दिलेल्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्याची प्रणाली जसजशी उत्तर-पश्चिमेकडेकडे सरकेल तसतसे उत्तरेकडील राज्यात पावसाचा जोर वाढेल. १६ आणि १७ जुलैदरम्यान उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासात राजस्थानचा पूर्व भाग आणि त्याला लागून असणाऱ्या मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. त्याचवेळी पश्चिमेकडे देखील हा पाऊस हळूहळू सरकण्याची चिन्हे आहेत. सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि नजीकच्या भागांवर कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशभरात कमीजास्त प्रमाणात पावसाची हजेरी दिसून येत आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये आता पावसाने उसंत घेतली असून ऊन- सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. विदर्भात पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. कोकणातही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून आकाश निरभ्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार विदर्भाच्या उत्तरेकडील भागांमध्ये मुसळधार पावसाच्या धर्तीवर “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मात्र ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई शहरात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे.  शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहणार असून अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळेल. तर, अधूनमधून शहरात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, सौराष्ट्र आणि कच्छसह आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाह, कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि तामिळनाडूतील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देत नागरिक आणि प्रशासनाला भारतीय हवामान खात्याने सतर्क केले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान निरोबार बेट समुहांवरही हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.