या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंटू ओस्तवालचे पुन्हा नाव चर्चेत

झपाटय़ाने विकसित होणाऱ्या नागपुरात आता अंमली पदार्थाचा व्यापार वाढू लागला आहे. गांजा, चरस आदी अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र असलेले हे शहर आता कोकेन तस्करीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले आहे. गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) केलेल्या कारवाईतून कोकेन तस्करीचे नागपूर हे केंद्र बनत चालल्याचे स्पष्ट होत आहे.

३० सप्टेंबर २०१६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर युजो इग्वे फर्टिनंड मेलडी (२६) याला बनावट पारपत्र बाळगण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याने नागपुरात पिंटू ओस्तवाल नावाच्या व्यक्तीला कोकेन पुरवठा करण्यासाठी आल्याची कबुली दिली. पोलिसांनी पिंटूची चौकशी केली. त्यात ते परस्परांच्या संपर्कात असल्याचे पुढे आले. पोलिसांनी पिंटूला आरोपी न करता सोडून दिले. २० ऑक्टोबर २०१६ पोलिसांनी सापळा रचून सचिन प्रकाश आंबागुहे (३१) आणि अलताफ शेख ऊर्फ बबलू दद्दा शेख (४२) रा. सोमवारी क्वॉटर्स यांना कोकेन तस्करी प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी मुंबईतील कुख्यात कोकेन तस्कर ब्रिजेश मिश्रा याच्यासह बंटी ऊर्फ चार्ली स्निफर रा. मुंबई, गोविंद, सुमीत शिवलानी, रितेश, पिंटू, राजा, रवि कटनी आदींसह एकूण ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आंबागुहे आणि बबलू यांना वगळता पोलिसांनी अद्याप कोणालाच अटक केली नाही. २७ जानेवारीला नागपूर पोलिसांनी पराग नारायण सामणी (४४) रा. आर.एस. निमकर मार्ग, ग्रँट रोड, नागपाडा याला ५५ गॅ्रम कोकेनसह अटक केली होती. नागपुरात विक्री करण्यात येणाऱ्या कोकेनची मुंबईतून तस्करी करण्यात येते, अशी माहिती त्याने दिली होती.

या व्यवसायात नायजेरियन लोक सहभागी असून ते मुंबईत वास्तव्यास आहेत, असे सांगितले. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला आणि सामणी याच्यामार्फत नायजेरियन सॅन्डी इग्वे न्वागू (३५) याच्याशी संपर्क करून त्याला कोकेन घेऊन शहरात बोलाविले व अटक केली.

सोनेगाव आणि बबलूच्या प्रकरणात नागपुरात कोकेन तस्करीचे रॅकेट हाताळणारा पिंटू ओस्तवाल याचे नाव समोर आले. आता पोलिसांनी पुन्हा ११ कोकेन तस्करांना अटक केली. यावेळीही पिंटू व इतरांचे नाव समोर आले असल्याची माहिती आहे. यासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पिंटू ओस्तवालसह सर्वाची चौकशी करण्यात येत असून कोकेन तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

डब्बाव्यापाऱ्यांशी संबंध

कोकेन हा महागडा अंमली पदार्थ आहे. त्यामुळे कोकेनची नशा करणारे हे उच्चभ्रू लोक असतात. शहरात उघडकीस आलेल्या डब्बा व्यापाऱ्यांशी याची तार जुळले असल्याची माहिती समोर आली असून पिंटू हा अनेक डब्बा व्यापाऱ्यांच्या संपर्कात आहे. तोच डब्बा व्यापाऱ्यांना कोकेन पुरविण्याचे काम करतो, अशी माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International network of cocaine smuggling issue
First published on: 18-08-2017 at 02:55 IST