चंद्रपूर : ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री गस्तीवर असताना वाळूने भरलेला ट्रक पकडला. त्यानंतर पहाटे तीन वाजता चिमूर पोलीस ठाण्यात आणून ठेवला. दहा दिवस हा ट्रक बेवारस स्थितीत ठाण्यात होता. ट्रकमालकाशी आर्थिक देवाणघेवाण झाल्यामुळेच गुन्हा दाखल केला नाही अथवा तक्रारही नोंदवली नाही अशी तक्रार पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांची अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यामार्फत चौकशी सुरू केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे. मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरीत नदीनाल्यांवर तस्करांचे साम्राज्य असते. वाळू तस्करांवर लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव २८ ऑक्टोबर रोजी गस्तीवर असताना वाळू तस्करी करताना (एम.एच.३६ ए.ए.९९३३) हा हायवा ट्रक पकडला. तो चिमूर पोलीस ठाण्यात पहाटे तीन वाजताच्या सुमारास उभा करून दिला. विशेष म्हणजे, या ट्रकची फिर्याद, जप्ती, पंचनामा किंवा स्टेशन डायरी नोंद एसडीओ जाधव यांनी पोलीस ठाण्याला दिली नाही. त्यामुळे बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकची माहिती चिमूरचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांच्या माध्यमातून कार्यालयीन पत्र पाठवून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना दिली. दरम्यान, चिमूर पोलिसांनी ट्रकमालक धनपाल गभने याला बोलावून चौकशी केली असता भंडारा जिल्ह्यातील सावरला येथील विवेक राजू दोनाडकर याला ट्रक विकल्याची माहिती मिळाली.
पोलीसांनी विवेक दोनाडकर याची चौकशी केली असता हायवा ट्रकचा वापर वाळू तस्करीत केला जात असल्याचे सांगितले. दरम्यान, याच चौकशीत दोनाडकर यांनी हायवा ट्रक पकडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचे बयान दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांनी हायवा ट्रक पकडल्यानंतरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नाही किंवा फिर्याद, जप्ती, पंचनमा किंवा स्टेशन डायरी नोंदही केली नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडेही प्राप्त झाली.
या तक्रारीच्या आधारावर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांची चौकशी सुरू केली आहे. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कतकाडे यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी चौकशी अधिकारी कतकाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना विचारले असता, अर्थिक व्यवहाराचा आरोप असल्यानेच चौकशी सुरू केल्याचे सांगितले. चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणात नेमके काय घडले हे सांगता येईल. तसेच चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचेही सांगितले.
